Surya Grahan | pixabay.com

Last Surya Grahan Of 2024:  भारतामध्ये ग्रहण ही केवळ खगोलीय घटना नसते, याच्याशी निगडीत अनेक धार्मिक मान्यता असल्याने त्याची तारीख, वेळ, सूतककाळ याच महत्त्व असतं. 2024 वर्षामधील शेवटचं सूर्यग्रहण (Surya Grahan) यंदा 2 ऑक्टोबर दिवशी आहे. हे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्या (Sarvapitri Amavasya) दिवशी म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या आदल्या दिवशी होणार आहे. 2 ऑक्टोबरचं सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहणात अमावस्येच्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात. यामध्ये चंद्रामागे सूर्य झाकला जातो. मग 2 ऑक्टोबरचे हे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार का? त्याचे नियम पाळावे लागणार का? हे जाणून घ्या.

2 ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण

2 ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. पण हे ग्रहण भारतामधून दिसणार नसल्याने या ग्रहणाचे नियम पाळणं गरजेचे नसेल. दरम्यान सूर्यग्रहणात सूतककाळ हा ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही अशावेळी निर्माण होते.

2 ऑक्टोबरच्या सूर्यग्रहणाच्या वेळा

भारतामधून 2 ऑक्टोबरचं सूर्यग्रहण दिसणार नाही. पण भारतीय वेळेनुसार, ते रात्री 9.13 मिनिटांनी सुरू होणार असून पहाटे 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत चालणार आहे. यामध्ये सुतककाळ 12 तास आधी म्हणजे सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी सुरू होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री लागत असल्याने भारतात ते दिसणार नाही आणि सुतककाळ देखील मान्य नसेल.

सूर्यग्रहण कुठे दिसणार?

सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसले तरीही फिजी, अर्जेंटीना, प्रशांत महासागर, दक्षिण अमेरिका, पेरू या भागातून दिसणार आहे.

सूर्यग्रहणाचा दिवस हा सर्वपित्री अमावस्येचा दिवस आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. याची सांगता सर्वपित्री अमावस्येला होते. हिंदू मान्यतांनुसार, सर्वपित्री अमावस्येला सारे पितर पृथ्वीवरून परत जात असतात. त्यामुळेच ही मोक्ष अमावस्या देखील असते. ज्यांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नाही अशांचं श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला केले जाते.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.