
India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर 2 जुलैपासून सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ नुकताच संपला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात 151 षटकांत सर्व गडी गमावून 587 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 269 धावांची शानदार खेळी साकारली. इंग्लंडसाठी शोएब बशीरने तीन बळी घेतले, तर ख्रिस वोक्स आणि जो टंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
Shubman Gill's day. India's day.
🔗 https://t.co/t4iTZ4bYn1 pic.twitter.com/taMlc1sscE
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 3, 2025
इंग्लंडची खराब सुरुवात, भारतीय गोलंदाजांचा दबदबा
भारताच्या या विशाल धावसंख्येसमोर इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी केवळ 25 धावांमध्येच तीन महत्त्वाचे गडी गमावले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. युवा वेगवान गोलंदाज आकाशदीपने एकाच षटकात इंग्लंडला दुहेरी झटका दिला. त्याने सलामीवीर बेन डकेट (0) आणि ओली पोप (0) यांना लागोपाठ बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. यानंतर मोहम्मद सिराजने आक्रमक फलंदाज जॅक क्रॉलीला (19) तंबूत पाठवले, ज्यामुळे इंग्लंडची अवस्था 3 बाद 25 अशी बिकट झाली.
हे देखील वाचा: Shubman Gill Double Century: शुभमन गिलचा दुसऱ्या कसोटीत धुमाकूळ; 5 विक्रमांची नोंद, गावस्कर-कोहलींच्या क्लबमध्ये समावेश!
दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडची झुंज
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 3 गडी गमावून 77 धावा केल्या होत्या. अनुभवी फलंदाज जो रूट (18 धावा) आणि आक्रमक हॅरी ब्रूक (30 धावा) हे दोघे नाबाद राहत इंग्लंडची खिंड लढवत आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड निर्माण केली आहे. येत्या दिवसांमध्ये इंग्लंड संघ या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कशी झुंज देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.