सूर्य ग्रहण 2020 (Photo Credits: Pixabay)

Surya Grahan 2020: देशात येत्या रविवारी म्हणजेच 21 जून रोजी सूर्य ग्रहण (Surya Grahan) दिसणार आहे. या सुर्यग्रहणादरम्यान, सूर्यचा (Sun) प्रकाश पृथ्वीवर (Earth) पूर्णपणे येणार नाही. हे सूर्यग्रहण देशातील बऱ्याच भागात कंकणाकृती स्थितीत दिसेल. रविवारी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 4 मिनिटांपर्यंत हे सूर्यग्रहण दिसणार आहे.

कंकणाकृती स्थितीत चंद्र हा सूर्याच्या समोर येतो आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो. या परिस्थितीला 'कंकणाकृती सूर्यग्रहण' किंवा 'रिंग ऑफ फायर' असंही म्हणतात. अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात. तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. या ग्रहणाचे तीन प्रकार असतात. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. रविवारी 21 जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर भारताच्या काही भागांतून दिसणार आहे. यावर्षी सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. (हेही वाचा - Surya Grahan June 2020 Timing: कंकणाकृती सूर्यग्रहण 21 जून दिवशी; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर्, नाशिक सह भारताच्या विविध शहरात नेमकी किती वाजता पाहता येणार ही खगोलीय घटना!)

या देशात दिसणार सूर्यग्रहण -

दरम्यान, येत्या रविवारी दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था यंदा सुदान, इथियोपिया, येमेन, सौदी अरेबिया, ओमान, पाकिस्तान या देशांतील काही भागातून दिसणार आहे.

भारतात या ठिकाणी दिसणार सूर्यग्रहण -

भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून हे ग्रहण कंकणाकृती स्थितीत दिसणार आहे. तसेच भारताच्या बाकीच्या भारतात खंडग्रास स्थितीत हे ग्रहण पाहायला मिळेल. भारतातील प्रयागराज शहरातून हे सूर्यग्रहण 78 टक्के दिसणार आहे. याशिवाय हरियाणामधील सिरसा, कुरुक्षेत्र, राजस्थानमधील सूरजगढ़, उत्‍तराखंडमधील डेहरादून आणि चमोलीमध्ये पूर्णपणे सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 21 जून रोजी दिसणारं सूर्यग्रहण या वर्षातील सर्वात मोठं ग्रहण असणार आहे. या सूर्यग्रहणाचा कालावधी इतका मोठा असेल की, या दिवशी पृथ्वीवर 6 तास रात्रीसारखा अंधार असेल. सूर्यग्रहण पाहताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे ग्रहण पाहताना कधीही थेट सूर्याकडे पाहू नका. ग्रहण पाहण्यासाठी खास फिल्टर लावलेले चष्मे लावा. त्यामुळे सूर्याच्या तीव्र किरणांचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होणार नाही.