Safety Tips to Watch Surya Grahan: 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या काही खास टिप्स
How to watch Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

21 जून रोजी या वर्षातले तिसरे ग्रहण आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) 21 जून रोजी सूर्यग्रहण सकाळी 9.16 वाजता सुरु होणार असून तब्बल 6 तास चालणार आहे. दुपारी 3.04 मिनिटांनी ग्रहण सुटेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकेल. परंतु, चंद्र पृथ्वीपासून जास्त लांब असल्यामुळे सूर्याला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे सुर्याचा प्रकाश चंद्राच्या आडून दिसणार त्यामुळे गोलाकार कंकण तयार होणार. म्हणून याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. दरम्यान या खगोलीय घटनेबद्दल अनेकांना उत्सुकता असते. ते पाहण्यासाठी लहानांसह मोठे देखील खूप आतुर असतात. मात्र उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहणे डोळ्यांसाठी घातक ठरु शकते. त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घ्या... (Surya Grahan June 2020 Sutak Time: 21 जूनच्या सूर्य ग्रहणाचा सुतक काळ काय? या वेळेत काय कराल काय टाळाल?)

सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास टिप्स:

# ग्रहण पाहण्यासाठी बाजारात खास सनग्लासेस मिळतात. तुम्ही ते विकत घेऊ शकता. सध्या कोविड-19 च्या प्रभावामुळे काही दुकानं बंद असण्याची शक्यता आहे. मात्र तुम्ही सनग्लासेस ऑनलाईन ऑर्डर करु शकता.

# तुमचे नेहमीचे गॉगल्स, सनग्लासेस वापरुन सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करु नका. कारण त्यामुळे सुर्याच्या अतिनील किरणांपासून डोळांचे संरक्षण होईल याची खात्री देता येत नाही.

# तुमच्याकडे टेलिस्कोप असेल तरी देखील तुम्ही थेट सूर्यग्रहण पाहू शकत नाही. यासाठी टेलिस्कोपला सोलार फिल्टर्स लावावे लागतील. त्यामुळे सूर्यकिरणे थेट आता येण्याला आळा बसतो.

# सूर्यग्रहण तुम्ही मुलांसोबत बघणार असाल तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण काळात थेट आकाशाकडे पाहणे टाळावे, याची माहिती मुलांना द्यावी.

# काही लोक ग्रहण पाहण्यासाठी X-ray किंवा गिफ्ट पॅकिंग पेपरचा वापर करतात. यामुळे ग्रहणही दिसते पण हा ग्रहण पाहण्याचा सुरक्षित उपाय नाही.

त्यामुळे डोळ्यांची हानी टाळण्यासाठी ग्रहण पाहताना सुरक्षित उपायांचा मार्ग अवलंबणे केव्हाही योग्यच ठरेल. विशेषतः ग्रहण पाहताना मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.