Supermoon 2022: 13 जुलै रोजी दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद्र; समुद्रावरही पडेल प्रभाव, जाणून घ्या सविस्तर
Moon Pics (Photo Credits: Twitter)

या वर्षातील मोठ्या खगोलीय घटनांपैकी एक 'सुपरमून' (Supermoon 2022) जुलैमध्ये दिसणार आहे. बुधवार 13 जुलै रोजी ही घटना पाहता येईल. जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा सुपरमून होतो. यावर्षी 13 जुलै रोजी आकाशात सुपरमूनचे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. सुपरमूनच्या रात्री, चंद्र रोजच्या तुलनेत खूपच मोठा, उजळ आणि गुलाबी चमकतो. 13 जुलै रोजी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल. या काळात चंद्र पृथ्वीपासून केवळ 357,264 किमी अंतरावर असेल.

सुपरमूनचा प्रभाव समुद्रावरही दिसणार आहे. सुपरमूनमुळे भरती-ओहोटीची शक्यता वाढते. खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सुपरमूनच्या वेळी किनारपट्टीच्या भागात येणारे वादळ पूरसदृश परिस्थिती निर्माण करू शकते. 2022 चा दुसरा सुपरमून या आठवड्यात तीन दिवस राहणार असल्याचे अमेरिकन अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे. नासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सुपरमून दरम्यान चंद्र सुमारे तीन दिवस (मंगळवार सकाळपासून शुक्रवार सकाळपर्यंत) दिसेल.

13 जुलै रोजी रात्री 12:07 वाजता, सुपरमून दिसेल. यानंतर तो 3 जुलै 2023 रोजी दिसणार आहे. सुपरमूनला बकमून असेही म्हणतात. याशिवाय जगभरात त्याची वेगवेगळी नावे आहेत. सुपरमून वर्षातून फक्त तीन ते चार वेळा दिसतो. 2022 चा पहिला सुपरमून जूनमध्ये होता. वर्षातील तिसरा आणि शेवटचा सुपरमून ऑगस्टमध्ये दिसणार आहे. (हेही वाचा: Alien News: समुद्राच्या तळाशी राहतात एलियन्स, मानवापेक्षाही आहेत आधुनिक, UFO अभ्यासकाचा दावा)

सुपरमून हा शब्द पहिल्यांदा रिचर्ड नोल यांनी 1979 मध्ये वापरला होता. चंद्र आणि पृथ्वीमधील सरासरी अंतर चार लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे, पण यावेळी सुपरमूनच्या निमित्ताने हे अंतर सुमारे साडेतीन लाख किलोमीटर असेल. या घटनेत 'सुपर'चा अर्थ काही नाही. फक्त एक गोष्ट घडते की चंद्रइतर दिवसांपेक्षा मोठा दिसतो आणि त्याची चमक जास्त असते.