लॅन्सेट नियतकालिकेच्या प्रदूषणासंदर्भातील अहवालामधून भारत हा सर्वाधिक प्रदूषित देश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली होती. गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे सध्या हवेच्या प्रदुषणामध्येही वेगाने वाढ होत आहे. चीन, अमेरिका, रशिया, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त हवेचे प्रदूषण असणारे देश आहेत. हवेचे प्रदूषण रोकण्यासाठी काही दिवसांपासून चीन अनेक उपाययोजना राबवत आहे मात्र दुसऱ्या बाजूला भारत हवा प्रदुषणाची राजधानी बनत आहे. यावरूनच काही वर्षांपूर्वी चौथ्या क्रमांकावर असणारा भारत मागील काही महिन्यांपासून दुसऱ्या क्रमांकावर पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वेक्षणानुसार, भारतात २०१५ साली विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे ९० लाख लोकांनी प्राण गमावला. यातील २८ टक्के लोक भारतीय होते. हवा प्रदूषणामुळे गेल्या २५ वर्षांमध्ये मृत्यूदर ५० % नी वाढला आहे. हवा प्रदुषणामुळे फक्त २०१५ मध्ये भारतात जवळजवळ १८ लाख लोक मृत्यू पावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फक्त चीन आणि भारतातील मृतांचा आकडा हा जगभरातल्या आकडेवारीच्या अर्ध्याहून जास्त आहे.

तिकडे घटले, इकडे वाढले :

१९९० मध्ये श्वसनासंबंधी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूसंदर्भात चीन आणि भारत एकाच स्थानावर होते, दोन्ही देशांमध्ये हे प्रमाण प्रत्येकी १ लाख लोकांमागे १३.2 टक्के इतके होते. आणि बघता बघता २०१५ मध्ये भारतामधील हे प्रमाण १४.७ इतके झाले तर चीनमध्ये ५.९ इतके खालावले. एका अहवालानुसार, चीनमध्ये अशा प्रदूषणयुक्त हवेच्या शुद्धीसाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात, इतर अनेक उपाययोजना योजल्या जात आहेत ज्यामुळेच तिथले हवा प्रदूषणाचे प्रमाण घटले आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन वायू निर्माण होत असून श्वसनेंदियांचे रोग जडत आहेत. गतवर्षी दिवाळीत दिल्ली आणि एनसीआर परिसरात पसरलेली प्रदूषणाची चादर यामुळे ही समस्या किती जठील झाली आहे याची प्रचिती आली होती. ओझोन वायूमुळे होणा-या मृत्यूंचा आकडा भारतात जास्त आहे. भारताचा हा आकडा बांगलादेशच्या १३ तर पाकिस्तानच्या २१ पट जास्त आहे.

जगभरातील सर्व देशांतील एकूण लोकसंख्येपैकी ९२% (६७० करोड) लोकांना शुद्ध हवा प्राप्त होत नाही. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक वायूंमुळे PM २.५ मध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत.

PM स्थिती :

PM (Particulate matter) हवेत असणाऱ्या काही घटकांमुळे होणारे प्रदूषण म्हणजे PM होय. यामध्ये अनेक विषारी वायू, अॅसिड यांचा समावेश होतो. एका विशिष्ट जागेत असणाऱ्या धुळीचे प्रमाण हे PM मानले जाते. भारतीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार, भारतामधील शहरांतील PMची पातळी ही ४० मायक्रोग्रॅम/क्यूबिक मीटर असणे गरजेचे आहे मात्र सध्या ही पातळी वाढून २५० मायक्रोग्रॅम इतकी झाली आहे.

भारतामध्ये दिवसेंदिवस हवा प्रदूषणामुळे अनेक आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे, हृदयांसंदर्भातील आजारांचे प्रमाण २५.४८%नी वाढले आहे, फुफ्फुसांसंदर्भातील आजारांचे प्रमाण १७.२२ नी तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण २.२%नी वाढले आहे. या आकड्यांवरून हे लक्षात येते की भारतामध्ये हवा प्रदूषणाची समस्या कोणत्या थराला जाऊन पोहचली आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरात १० पेट्रोलच्या वाहनांपेक्षा एका डिझेलच्या वाहनांतून बाहेर पडणारा धूर हा सर्वांसाठी घातक ठरतो.

देशातील प्रत्येक नागरिकाने जागे व्हायला पाहिजे. प्रदूषणाला रोखणारा आराखडा सरकारने तयार केला पाहिजे. राज्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, नागरिकांना प्रदूषणबळीची जाणीव झाली पाहिजे. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपायोजना केल्या पाहिजेत. नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. प्रत्येकाला आपण घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत प्रदूषणात राहत असल्याची जाणीव झाली पाहिजे.

वायू प्रदूषण: काही तथ्ये

• अनेक कारणांमुळे भारतात लोक मरण पावतात, मात्र या कारणांमध्ये ‘हवा प्रदूषण’ या कारणाचा क्रमांक चौथा आहे.

• प्रत्येक वर्षी 6 लाख लहान मुले हवा प्रदुषणामुळे मरण पावतात.

• हवेचे प्रदूषण सर्वात जास्त असणाऱ्या ठिकाणांमध्ये मुंबई आणि चंद्रपूर मधील ५, ठाण्यामधील ६, पुण्यातील ४, जालना-लातूर-रायगड प्रत्येकी २, नागपूर आणि औरंगाबाद प्रत्येकी १ ठिकाणांचा समावेश आहे.

• जगात ‘दिल्ली’ सर्वात जास्त हवेचे प्रदूषण असणारे शहर आहे.

(Health effect institute survey)