लाल धबधब्याचे गूढ

वातावरण, आकार आणि तापमानाचा विचार करता मंगळ आणि पृथ्वी हे फार वेगवेगळे ग्रह आहेत. मंगळ खूप थंड असू शकतो किंवा अतिशय शुष्कदेखील असू शकतो किंवा राहण्यास अयोग्य देखील ठरू शकतो. पण दोन्ही ग्रहांवरची भूवैज्ञानिक प्रक्रिया ही जवळजवळ एकच आहे. एखाद्या ठिकाणी जीव-जंतू यांची व्युत्पत्ती होण्यास एका ठराविक वातावरणाची गरज असते, म्हणूनच पृथ्वीनंतर मंगळ असा ग्रह आहे जिथे मनुष्यवस्ती वसू शकते. मात्र पृथ्वीवर देखील असे एक ठिकाण आहे जिथली परिस्थिती किंवा वातावरण अगदी मंगळासारखे आहे.

रॉस समुद्र आणि पूर्व अंटार्क्टिक दरम्यान समांतर दऱ्यांची एक मालिका आहे, याच अंटार्क्टिका बर्फामधून झिरपणारा एक तेजस्वी लाल धबधबा आहे तो म्हणजे ब्लड फॉल्स ऑफ अंटार्क्टिका ! मॅकमरडो ड्राय व्हॅली प्रदेश, पृथ्वीवरील असणाऱ्या सर्वात थंड प्रदेशापैकी एक तसेच राहण्यास अयोग्य, या प्रदेशाची तुलना शास्त्रज्ञ मंगळाशी करतात. अंटार्क्टिका ब्लड फॉल्स आणि मंगळ हे दोन्ही प्रदेश त्यांच्या पर्यावरणाबाबतीत अतिशय समान आहेत. अंटार्क्टिका मंगळासारखा आहे की, मंगळ अंटार्क्टिकासारखा आहे हे एक गूढच आहे मात्र पृथ्वीवरील या ठिकानाने मंगळाच्या इतिहासाला आणि तिथे वसू शकत असलेल्या सजीव वस्तीला दुजोरा दिला आहे.

1911 साली ऑस्ट्रेलियन भूगोलाचा अभ्यासक, मानववंशशास्त्रज्ञ, आणि जागतिक शोधक ग्रिफिथ टेलर यांनी ब्लड फॉल्स ऑफ अंटार्क्टिकाचा शोध लावला. नंतर अंटार्क्टिकाची ही दरी टेलर दरी म्हणून प्रसिद्ध झाली.

शास्त्रज्ञांना अंटार्क्टिक खोऱ्यात जमिनीच्या पापुद्र्याखाली एक खारट सच्छिद्र जाळे आढळले. याचा शोध घेतला असता यामध्ये काही सूक्ष्मजीव देखील आढळले. यामुळे ब्लड फॉल्समध्ये जीवन अस्तित्वात असल्याचा प्रश्न निर्माण झाला. याचे असेही निष्कर्ष निघाले की, हे मंगळ किंवा इतर ग्रहांवर आढळणाऱ्या सजीवांसारखे हे सूक्ष्म घटक असावेत. मात्र हे जीव पृथ्वीवरील जिवंत परिस्थितीशी कसे काय जुळवून घेऊ शकतात हा देखील फार मोठा प्रश्न होता.

रक्ताचा रंग –

ब्लड फॉल्स ऑफ वॉटरने शास्त्रज्ञांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. हे किरमिजी रंगाचे पाणी कुठून, कसे येत आहे याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. सुरुवातीला लाल एकपेशीय वनस्पतींमुळे (मंगळ ग्रहावर आढळणारी) हा रंग निर्माण होत असावा असे वाटले. मात्र यामुळे शास्त्रज्ञ अजूनच बुचकळ्यात पडले कारण जगण्यास अशक्य असणाऱ्या अशा प्रदेशात ही वनस्पती कित्येक वर्षे कशी काय जिवंत राहू शकते? पाण्यात असलेल्या उच्चतम क्षाराच्या प्रमाणामुळे पाण्याचे बर्फात रुपांतर होत नसावे त्यामुळेच जीव-जंतू इथे जगू शकतात अशीही एक थेअरी मांडली गेली. नंतर असा शोध लागला की हा रंग उच्च प्रमाण असलेल्या लोह ऑक्साइडमुळे निर्माण होत आहे. शास्त्रज्ञांनी या धबधब्याचा अभ्यास केला असता बर्फाच्या एक चतुर्थांश खाली असणाऱ्या उप-हिमाच्या तळ्यामधून या पाण्याचा उगम होत असल्याचा शोध लागला. पृष्ठभागावर बर्फाचा तुटवडा, वरून खाली धावणारी जोरदार थंड, कोरडी हवा अशा प्रदेशात एक वनस्पती कित्येक वर्षे जगू शकते हे एक गूढच होते.

उप-हिमाचे तळे हे साधारण 5 दशलक्ष वर्षांपूर्वी बनले असावे. जेव्हा वाढत्या समुद्राच्या पातळीमुळे अंटार्क्टिका भरला होता, ज्याची परिणीती एका खारट तलावात झाली. नंतर बर्फाखाली हा तलाव बुडून गेला पण उच्च मिठाच्या पातळीमुळे हा तलाव गोठू शकला नाही. पाण्याचे तापमान 14 अंश सेल्सियस होते मात्र मिठाचे प्रमाण हे समुद्राच्या पाण्यापेक्षा 3-4 पट जास्त असल्याने पाणी गोठू शकले नाही.

पाण्याच्या परीक्षणामधून जवळजवळ 17 दुर्मिळ जीवाणूंचा शोध लागला आहे, जे की अशा अतिशय थंड, खारट पाण्यातही जिवंत राहू शकतात. इथे घडणाऱ्या काही अज्ञात रासायनिक प्रक्रिया तर अजून आजच्या शास्त्रज्ञांना समजल्या नाहीत. सूक्ष्मजीव श्वसनामुळे निर्माण होणाऱ्या उत्पादनाची लोखंडाशी रासायनिक प्रक्रिया होते ज्यातून निर्माण होणारे सल्फेटचा वापर या जीवाणूंसाठी होतो ही फक्त विचारांमधीलच थेअरी आहे. प्रत्यक्षात ती कशी होत असावी याचा शोध अजूनही चालला आहे.

शास्त्रज्ञांना अंटार्क्टिका हिमनदी खाली काही प्राचीन पर्यावरणातील घटक आढळले आहेत, की जे प्रकाश आणि ऑक्सिजन विना लाखो वर्षे जिवंत आहेत. या पर्यावरणातील जिवाणूंमध्ये एक विविधता आहे जी लोखंड व गंधकासह थंड, खारट पाण्यात पोसली जाते. अशा परिस्थितीमध्येही काही जीव जिवंत आहेत यामुळे हे देखील सिद्ध होऊ शकते की अशा प्रकारचे जीव मंगळावरदेखील उपलब्ध असू शकतात. याच गोष्टीला दुजोरा देण्यासाठी पृथ्वीवरील हे ‘बर्फाखालाचे जीवन’ उत्तम उदाहरण ठरू शकते.