Lockdown Effect: भारतात प्रदूषणाची पातळी गेल्या 20 वर्षात सर्वात कमी; NASA ने प्रसिद्ध केले फोटो
Air Pollution Drops in Northern India (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे लक्षणीय बदल घडत आहेत. यामुळे विषाणूचा संसर्ग तर रोखला जातच आहे, मात्र लोक अथवा गाड्या रस्त्यावर नसल्याने पर्यावरणामध्येही चांगले बदल घडल आहेत. लॉकडाऊनमुळे प्रदूषणाची पातळी (Air Pollution Level) झपाट्याने खाली आली आहे. भारतातील प्रदूषणाची समस्या जवळजवळ संपुष्टात येत असल्याचे, अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासानेही (NASA) उपग्रह छायाचित्र शेअर करून याची पुष्टी केली आहे. महत्वाचे म्हणजे उत्तर भारतात गेल्या 20 वर्षांत प्रदूषणाची पातळी इतकी खाली कधी आली नव्हती.

भारतातील प्रदूषणाची पातळी कमी झाल्याचे नासाने उपग्रह छायाचित्र प्रसिद्ध करून सांगितले आहे. भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे आणि देशात राहणारे जवळपास 130 कोटी लोक सध्या त्यांच्या घरातच आहेत. देशात लॉकडाऊनमुळे कारखाना, कार, बस, ट्रक, ट्रेन, विमानांचे उड्डाण बंद आहे. या गोष्टी थांबल्यानंतर नासाच्या उपग्रह सेन्सरने भारताची टिपलेली प्रतिमा थक्क करणारी आहे. नासाच्या मते उत्तर भारतातील वायू प्रदूषणाची पातळी अतिशय कमी झाली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून उत्तर भारतातील वायूजनित कणांची पातळी लक्षणीय घटल्याचे नासाने उपग्रह आकडेवारीद्वारे सांगितले आहे. (हेही वाचा: जाणून घ्या भारतातील लॉक डाऊनचा प्रदूषणावर काय झाला परिणाम; दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच उद्भवली ‘ही’ परिस्थिती)

युनिव्हर्सिटीज स्पेस रिसर्च असोसिएशनचे पवन गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचा परिणाम आगामी काळात दिसून येईल जो पर्यावरणाच्या बाबतीत सकारात्मक ठरेल. एप्रिलमध्ये उत्तर भारताच्या हवेची प्रदूषण पातळी इतकी खालच्या पातळीवर याआधी कधी दिसली नाही. नासाच्या फोटोने हे सिद्ध केले आहे की एरोसोलमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र दक्षिण भारतात एरोसोलची पातळी वाढली आहे, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत येथे वाढ झाली आहे.