Last Chandra Grahan 2020: 30 नोव्हेंबरला वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; जाणून घ्या या छायाकल्प चंद्रग्रहणाच्या वेळा!
Flower moon (Photo Credits: Pexels)

November 2020 Chandra Grahan Date, Time:  नोव्हेंबर महिन्याच्या शेवटाला आता आकाशात वर्ष 2020 मधील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) दिसणार आहे. कार्तिकी पौर्णिमे (Kartiki Purnima) दिवशी म्हणजेच 30 नोव्हेंबरला हे छायाकल्प चंद्र ग्रहण (Upachaya Chandra Grahan) आहे. तुम्ही देखील अवकाशातील खगोलीय घटनांबाबत उत्सुक असाल तर या चंद्र ग्रहणाचा नजारा नक्की अनुभवा. यंदाच्या वर्षातील हे शेवटचं चंद्र ग्रहण असलं तरीही भारतीयांना ते दिसणार नाही. प्रामुख्याने ते ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका तसेच आशियाच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. थेट चंद्र ग्रहण पाहण्याचा तुमचा उत्साह असेलच तो तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मावर ते पाहू शकाल.

चंद्राच्या या उपछाया ग्रहणामध्ये चंद्राचा रंग हलका गहिरा होत जातो. चंद्र ग्रहणामध्ये पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते. या स्थितीमध्ये पृथ्वीच्या सावलीने चंद्र झाकोळला जातो.

भारतामधील चंद्र ग्रहणाच्या वेळा

30 नोव्हेंबरचे चंद्र ग्रहण हे एकूण 4 तास 21 मिनिटांचे आहे. या ग्रहणाच्या वेळेस चंद्राचा काही भाग क्षितिजापासून खाली असेल. दरम्यान या चंद्र ग्रहणाला दुपारी 1 वाजून 2 मिनिटांच्या सुमारास सुरूवात होईल. 3 वाजून 12 मिनिटांनी ते सर्वोच्च स्थानी असेल तर संध्याकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी ते संपणार आहे.

दरम्यान 30 नोव्हेंबरचे चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असल्याने या ग्रहणाबाबातचे वेध पाळण्याचे, सूतक काळ पाळण्याचे नियम लागू नसतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. त्यामुळे तुम्ही धार्मिकदृष्ट्या इतर ग्रहणांच्या वेळी जे नियम पाळता ते या ग्रहणासआठी बंधनकारक नसतील.

चंद्रग्रहणानंतर पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर14 तारखेला सूर्य ग्रहण आहे. हे वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण असेल. सोमवती अमावस्येला यंदा हे खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

(टीप: वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. त्यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही.)