ISRO chief K Sivan (Photo Credits: ANI)

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम 'चांद्रयान 2' (Chandrayaan 2) चे लॅंडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅन्डिंग करू न शकल्याने त्याचा संपर्क तुटला होता. नुकताच चंद्राच्या भूपुष्ठावर त्याचे अवशेष सापडल्याचा दावा अमेरिकेच्या 'नासा'ने (NASA) केला आहे. तसेच याचे श्रेय भारतातील चैन्नईमधील एका इंजिनियरला दिले होते. त्यानंतर आता भारताचे इस्त्रो प्रमुख के. सीवन (K Sivan) यांनी प्रतिक्रिया देताना 'नासा'च्या दाव्यापूर्वीच इस्त्रोने विक्रम लॅन्डरचा (Vikram Lander) शोध लावल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्याची माहिती इस्त्रोच्या वेबसाईटवर दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 'चांद्रयान-2' च्या विक्रम लँडरला शोधले, नासाकडून छायाचित्र जारी

22 जुलैला चांद्रयान 2 श्रीहरिकोटा येथून लाँच करण्यात आले. 7 सप्टेंबरला विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग चंद्रावर होणार होती. मात्र, अवघ्या 2.1 किलोमीटरवर असताना लँडरचा संपर्क तुटला होता. त्यानंतर नासा आणि इस्रो या दोन्ही संस्था विक्रम लॅन्डरचा शोध घेत होत्या.

ISRO चं 10 सप्टेंबरचं ट्वीट

इस्त्रो ने 10 सप्टेंबर दिवशी केलेल्या ट्वीटमध्ये, 'विक्रम लॅन्डरचा शोध लागला आहे, मात्र संपर्क होऊ शकला नाही.' अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. काल (3 डिसेंबर) दिवशी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने विक्रम लॅन्डरचा शोध लागल्याचे सांगत चैन्नईच्या तरूणाचं कौतुक केलं आहे. यावर माहिती देताना इस्त्रोने मात्र अवशेष आणि विक्रम लॅडरची जागा आधीच शोधल्याचं सांगत 'नासा'ला आपली वेबसाईट पाहण्याचा सल्ला दिला आहे.