जनुकीय तंत्राच्या सहाय्याने स्त्री-बीजाचा वापर करत रेडकू जन्माला घालण्याचा जगातील बहुदा पहिलाच प्रयोग भिलवडीत (जि. सांगली) यशस्वी झाला. भिलवडी येथील चितळेंच्या 'ब्रह्मा' प्रकल्पात हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात स्त्री-बीजाचा वापर करुन कृत्रिम रेतन करण्यात आले होते. विशेष म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आलेल्या या म्हैशीचे नाव 'दुर्गा' असे ठेवण्यात आले आहे. चितळे डेअरी आणि ‘जीनस एबीएस’चे संचालक विश्वास चितळे म्हशीपासून केवळ म्हैस किंवा रेडी जन्माला घालण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
'चितळे डेअरी'मध्ये 'ब्रम्हा' या प्रकल्पात गाय, म्हैस आणि दुधासंबंधी विविध संशोधन केले जाते. 'दुर्गा' म्हैशीची निर्मिती हीसुद्धा या प्रकल्पाचीच देण आहे. य संशोधनासाठी चांगल्या आणि उच्च प्रजातीचे रेडे आणि वळू जोपासले आहेत. 'दुर्गा' म्हैशीच्या निर्मितीसाठी 'महाबली' जातीच्या रेड्याचे वीर्य वापरण्यात आले. हा प्रयोग करताना 'महाबली'च्या वीर्यातील स्त्री-बीज विलग करण्यात आले. त्या बीजाचे रोपण मुऱ्हा जातीच्या म्हशीच्या गर्भात करण्यात आले. हे रोपण यशस्वी झाले. त्यामुळे 'दुर्गा' म्हस जन्माला आली, असे चितळे यांनी सांगितले.
दरम्यान, नव्या प्रयोगातून जन्मलेली म्हैस ३२ किलो वजनाची आहे. तर, ज्या म्हैशीवर प्रयोग झाला ती म्हैस मुऱ्हा प्रजातीची आहे. अधिक स्निग्धांशाचे दूध देणारी म्हैस असी या म्हैशीची ओळख आहे. म्हणूनच या प्रयोगासाठी खास या म्हैशीची निवड करण्यात आली. या म्हशीच्या दुग्धोत्पादनाबाबत बोलायचे तर, वेताच्या एका चक्रात ही म्हैस १२०० लिटर दूध देते. तर, मुऱ्हा जातीच्या म्हैशी ४ हजार लिटरपर्यंतही दूध देतात. या नव्या प्रयोगामुळे यापुढे कृत्रिमरीत्या केवळ 'म्हैशीं'ची पिढीच तयार करता येणे शक्य होणार आहे.