Chandrayaan-2 Launch: उद्या पहाटे आकाशात झेपावणार महत्त्वकांक्षी चांद्रयान-2; काउंटडाऊन सुरू
Chandrayaan-2 Launch (Photo Credits: Twitter, @isro)

भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. याचे सर्वात महत्वाचे उदाहरण म्हणजे इस्रो ISRO). चांद्रयान-1 नंतर 10 वर्षांनी इस्रोने पुन्हा एकदा चांद्रयान-2 (Chandrayaan 2) मोहीम हाती घेतली आहे. आज (दि. 14) ला सकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी काउंडाऊनला सुरुवात झाली. उद्या 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी हे यान आकाशात झेपावेल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून हे उड्डाण पार पडणार आहे. याकडे फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हे यान जीएसएलव्ही मार्क – 3 च्या मदतीने, अवकाशात झेपावणार आहे. प्रक्षेपणानंतर 16 दिवसांत पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करून, 52 दिवसांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. ही गोष्ट 6 किंवा 7 सप्टेंबरला घडेल अशी अपेक्षा आहे. ‘चांद्रयान- 2 ’मध्ये लँडर, रोवर आणि ऑर्बिटर असे तीन भाग आहेत. चंद्रावरील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात येणार आहे. यासाठी चंद्राच्या अशा जागेची निवड केली आहे ज्याचा यापूर्वी कोणी अभ्यास केला नाही. (हेही वाचा: ISROची महत्वाकांक्षी मोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी)

यापूर्वी दोन वेळा चांद्रयान चे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते, मात्र यावेळी भारत पुन्हा एकदा इतिहास रचेल अशी अपेक्षा आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे. दरम्यान 50 वर्षांपूर्वी, 16 जुलै रोजी भारताचे ‘अपोलो- 11’ यान आकाशात झेपावले होते. आता बरोबर 50 वर्षांनतर 15 जुलै रोजी चांद्रयान 2 आकाशात उड्डाण घेणार आहे. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण ऑनलाईन पाहण्यासाठी, https://liveregister.isro.gov.in/LRC/ या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.