Chandrayaan 2 Landing: विक्रम लँडर चंद्रावर उतरणार; Nat Geo India, Starplus, Star Bharat आणि  Hotstar वर पाहता येणार Live Streaming
Chandrayaan 2 Vikram Landing (Photo Credits: ISRO)

Chandrayaan 2 Landing Live Streaming: भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची (ISRO)  महत्वकांक्षी मोहीम चांद्रयान 2 (Chandryaan 2)  चे काऊंटडाऊन आता सुरु झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान  ISRO च्या माहितीनुसार, साधारण 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चांद्रयानातील विक्रम लॅण्डर (Vikram Lander)  हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole)  उतरणार आहे.  त्यानंतर दोन तासांनी म्हणजेच 5.30  ते 6.30 च्या सुमारास लँडरमधून प्रग्यान रोव्हर (Pragyan Rover) देखील बाहेर येईल. श्रीहरीकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण (Live Streaming) भारतात नॅशनल जिओग्राफिक इंडिया (Nat Geo India), स्टार प्लस (Starplus), स्टार भारत (Star Bharat) आणि हॉटस्टार (Hotstar) वर दाखवण्यात येणार आहे.

पहा ट्विट

चांद्रयान 2 हे 22 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत या यानाने 3  लाख 84 हजार किमी अंतर पार केले असून आता चंद्राच्या पृष्ठभागापासून यान अवघ्या 35 किमीवर आहे.हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील 70 विद्यार्थ्यांना देखील संधी मिळणार आहे. मोदींनी आपल्या मन कि बात कार्यक्रमात सांगितल्यानुसार देशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एका प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार होती. यामध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थिनीचा देखील समावेश आहे.

दरम्यान, चांद्रयान 2 ने 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता, त्यानंतर चंद्राची झलक दाखवणारे फोटो देखील इस्रोने शेअर केले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. तूर्तास सर्वांचे लक्ष या बहुप्रतीक्षित मोहिमेकडे लागून आहेत. ISRO च्या अधिकृत ट्विटर हॅण्डल  @ISRO  वरून  आपण या क्षणाचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स जाणून घेऊ शकता.