भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची (ISRO) चांद्रयान 2 (Chandryaan 2) ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) जाण्यासाठी निर्मित केलेली मोहीम आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चांद्रयानातील विक्रम लॅण्डर (Vikram Lander) हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. सद्यघडीला चांद्रयान चंद्रापासून अवघ्या 35 किमी अंतरावर आहे. यानाचे लँडिंग सुखरूप होताच त्यानंतर दोन तासांनी म्हणजेच 5. 30 ते 6. 30 च्या सुमारास विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर (Pragyan Rover) देखील बाहेर येईल. श्रीहरीकोटा (Shreehari Kota) येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत, तसेच देशातील 70 विद्यार्थ्यांना सुद्धा या क्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
ISRO ट्विट
ISRO: The soft landing of #Chandrayaan2 Vikram lander on lunar surface is scheduled between 1:30 am to 2:30 am on Saturday, September 07, 2019. This will be followed by the Rover roll out between 5:30 am to 6:30 am. pic.twitter.com/GCGYrYlohv
— ANI (@ANI) September 6, 2019
चांद्रयान 2 हे 22 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत या यानाने 3 लाख 84 हजार किमी अंतर पार केले आहे. विक्रम लॅण्डरचा प्रवास प्रतिसेकंद 6 कि.मी. इतका असून चंद्रावर उतरण्याच्या आधी 15 मिनिट विक्रमचा वेग 2 मीटर प्रतिसेकंद असणे गरजेचे आहे. हा 15 मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे. Chandrayaan 2 Launch: ISRO च्या दुसऱ्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेची 10 खास वैशिष्ट्यं
दरम्यान ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. यापूर्वीच्या चांद्रयान 1 या मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ बर्फ असल्याचे संकेत वर्तवले होते, याहीवेळेस हे संकेत निदर्शनास आल्यास चंद्रावर पाणी असल्याचे सिद्ध होणार आहे. तूर्तास सर्वांचे डोळे या बहुप्रतीक्षित मोहिमेकडे लागून आहेत. ISRO च्या अधिकृत ट्विटर हॅण्डल @ISRO वरून आपण या क्षणाचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स जाणून घेऊ शकता.