Samsung (Photo Credit-Twitter)

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) येत्या पाच वर्षांत भारतात 3.7 लाख कोटी रुपयांचे मोबाइल फोन तयार करण्याचा विचार करीत आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपल्या योजनेबाबत चर्चा केली आहे. या चर्चेनुसार, सॅमसंग 2.2 लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन तयार करेल, ज्याची किंमत  प्रॉडक्शन लिंक्ड इसेंटिव्ह (PLI) स्कीम अंतर्गत प्रति युनिट 15,000 पेक्षा जास्त असेल. एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'सॅमसंग आता येत्या पाच वर्षांत 50 अब्ज डॉलर्स मोबाइल फोन बनवण्याच्या विचारात आहे. त्यापैकी 30 अब्ज डॉलर्सचा स्मार्टफोन पीएलआय योजनेंतर्गत तयार केले जातील.’

सॅमसंग व्यतिरिक्त विदेशी कंपन्या विस्ट्रॉन, पेगाट्रॉन, फॉक्सकॉन आणि होन है आणि देशी कंपन्या लावा, डिक्सन, मायक्रोमॅक्स, पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स, सोजो, यूटीएल आणि ऑप्टिमस यांनी पीएलआय योजनेंतर्गत फायद्यासाठी अर्ज केले आहेत. सरकारला आशा आहे की येत्या 5 वर्षात भारतात 11 लाख कोटी रुपयांचे मोबाइल फोन बनतील. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या अंदाजानुसार मोबाइल फोन कंपन्या पीएलआय योजनेंतर्गत देशातील डिव्हाइसचे उत्पादन वाढवून 27.5 लाख कोटी रुपयांवर आणतील. (हेही वाचा: भारतात Samsung Galaxy Tab S7 लवकरच येणार, युजर्सला मिळणार 8000mAh बॅटरी सपोर्ट)

सध्या भारतात दरवर्षी 2 लाख कोटींपेक्षा जास्त मोबाइल फोन बनविले जातात. यामुळे सुमारे 5-6 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. 2025 पर्यंत या क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 10 लाख कोटी रुपयांची उत्पादन महसूल क्षमता निर्माण होण्याची सरकारची अपेक्षा आहे. सॅमसंग त्यांच्या फोनची निर्मिती सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत करेल. कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा मोबाइल फोन कारखाना सुरू केला असून, वार्षिक हँडसेट उत्पादन क्षमता 12 कोटी युनिट इतकी आहे. आयसीईएच्या म्हणण्यानुसार, भारतातील मोबाइल फोनचे बाजार मूल्य आतापर्यंत 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. संशोधन कंपनी आयडीसीच्या मते, एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय मोबाइल फोन बाजारात सॅमसंगचा वाटा 24 टक्के होता.