2024 पर्यंत रोबोट करतील मॅनेजर्सची 69 टक्के कामे; लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात
Robot Waiters (Photo Credits: ANI Twitter)

सध्या विविध क्षेत्रात अनेक ठिकाणी आपल्या यंत्रमानव (Robot) काम करताना दिसत आहेत. आगामी काळात, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे, रोजची कामे अधिक सुलभ होतील. संशोधन व सल्लागार कंपनी गार्टनर (Gartner)च्या अहवालानुसार, एआय, व्हर्च्युअल पर्सनल असिस्टंट आणि चॅटबॉट्स यासारख्या उदयोन्मुख नवीन तंत्रज्ञानामुळे, व्यवस्थापकांचा वर्कलोड 2024 पर्यंत 69 टक्क्यांनी कमी होईल. याचाच अर्थ या नवीन तंत्रज्ञानामुळे जगातील अनेक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

याबाबत बोलताना गार्टनरचे उपाध्यक्ष (संशोधन) हेलन प्वाटेविन म्हणाले, 'या तंत्रज्ञानामुळे पुढील चार वर्षांत व्यवस्थापकांच्या भूमिकेत मोठा उतार येईल. सद्यस्थितीत व्यवस्थापकांना फॉर्म भरण्यासाठी, माहिती अपडेट करण्यासाठी आणि वर्कफ्लोला मंजूर करण्यासाठी बराच वेळ खर्च होत आहे. जर ही कामे एआयद्वारे केली गेली, तर व्यवस्थापकांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी, कामाच्या बाबतील सुधारणा करण्यासाठी आणि नवीन उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी अधिक वेळ असेल.

गार्टनरने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 2023 पर्यंत एआय आणि नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञान कामकाजातील अनेक अडथळे आणि समस्या दूर करेल. यामुळे दिव्यांग लोकांच्या नेमणुका तीनपटीने वाढतील. सध्या विशेष गरजा असणार्‍या लोकांसाठी हे सोपे व्हावे म्हणून अनेक संस्थानी एआयचा यशस्वीपणे वापर सुरु केला आहे. सध्या जागतिक स्तरावर कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. संस्था गेल्या अनेक वर्षांपासून योग्य उमेदवार मिळवण्यासाठी झगडत आहेत. अशा परिस्थितीत, संस्था अपंगांना नोकरीवर घेत नाहीत, त्यामुळे अशा लोकांच्या कारकीर्दीवर त्याचा परिणाम होतो. (हेही वाचा: आता Federal बँकेत रोबो घेणार इंटरव्ह्यू; जाणून घ्या 'कशी' असेल मुलाखत प्रक्रिया)

गार्टनरचा असा अंदाज आहे की, ज्या संस्था अपंग लोकांना नोकरीवर ठेवतात, अशा ठिकाणी उमेदवार कंपनीमध्ये टिकून राहण्याचे प्रमाण 89 टक्के जास्त आहे. तसेच अशा संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या उत्पादकतेमध्ये 72 टक्के आणि नफ्यात 29 टक्के वाढ झाली आहे. आता एआय आणि उदयोन्मुख नवीन तंत्रज्ञान व्यवस्थापकांची भूमिका निश्चितपणे बदलण्यास मदत करेल. सध्या अनेक रेस्टॉरंट्स एआय रोबोटिक्स तंत्रज्ञान राबवत आहेत, जेणेकरुन अनेक अपंग लोक रिमोटचा वापर करून अशा रोबोटिक वेटरवर नियंत्रण ठेवू शकतात.