कोणत्याही नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. मुलाखतीत उमेदवाराचे बुद्धीकौशल्य तपासले जाते आणि त्यानुसार योग्य उमेदवाराची निवड केली जाते. अनेकदा ही मुलाखत एकापेक्षा अधिक व्यक्तीकडूनही घेतली जाते. परंतु, तुमची मुलाखत जर रोबोने (Robot) घेतली तर ? आता हे शक्य होणार आहे. कारण, आता फेडरल बँकेत (Federal Bank) कर्मचाऱ्यांची नियुक्ती कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेऊन केली जाणार आहे. म्हणजेच चक्क एक रोबो तुमची मुलाखत घेणार आहे. यासाठी FedRecruit नावाच्या रोबोची मदत घेतली जाणार आहे. रोबोने नोकरीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याची मुलाखत घेतल्यानंतर बँकेचा एचआर आणि वरिष्ठ अधिकारी त्या उमेदवाराला भेटतील. त्यानंतर त्या उमेदवारांची निवड केली जाईल. (हेही वाचा - नव्या वर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार)
अशी असेल मुलाखत प्रक्रिया -
- FedRecruit हा रोबो काही मुद्द्यांच्या आधारे उमेदवाराची चाचणी घेईल.
- हा रोबो उमेदवाराचे 360 डिग्री परीक्षण करेल.
- यात रोबोटिक इंटर्व्ह्यू, सायकोमेट्रिक आणि गेम बेस्ड परीक्षण करेल.
- यामुळे रोबोटिक मुलाखतीमुळे उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी मदत होईल.
- यात 'व्हर्च्युअल फेस टू फेस' व्हिडिओ कॅमेराही वापरला जाणार आहे.
- निवडलेल्या व्यक्तीला चॅटबॉक्सच्या माध्यमातून ऑफर लेटर पाठवलं जाणार आहे.
अशा पद्धतीने तुमची निवडप्रक्रिया पार पडेल. आतापर्यंत फेडरल बँकेने 350 प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची कँपसमधून निवड केली आहे. तसेच फेडरल बँक आता डिसेंबरपर्यंत 350 कर्मचाऱ्यांची निवड करणार आहे. बँकेने 2020 पर्यंत 700 लोकांची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. या पद्धतीने निवड झाल्याने उमेदवारांना फायदा होणार आहे.