Religious Hatred: Facebook वरील कंटेंट मुळे भारतात पसरत आहे धार्मिक द्वेष; खोट्या बातम्या व हिंसाचार पसरवण्यासाठी देखील जबाबदार- Report
Facebook | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

फेसबुकवर (Facebook) प्रकाशित होणारा आशय, कंटेंट, पोस्ट इत्यादींमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय द्वेष (Religious Hatred) पसरला आहे. अशा पोस्ट्समुळे फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली दंगल (Delhi Violence) घडली होती. या दंगलींमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 2019 नंतर तर फेसबुकवर अशा कंटेंटमध्ये 300% वाढ झाली आहे. याच काळात देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) विरोधात निदर्शने झाली. जुलै 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या फेसबुकच्या अंतर्गत संशोधनातून अशा सामग्रीमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

वॉशिंग्टन पोस्टने या संशोधनाचे विश्लेषण केले आहे. या अहवालानुसार, फेब्रुवारी 2020 मध्ये फेसबुक आणि त्याच्या मालकीचे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपद्वारे अफवा पसरवल्या गेल्या आणि हिंसाचाराचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडिया संशोधकांनी असे निदर्शनास आणले आहे की, फेसबुक प्लॅटफॉर्मवर अनेक ग्रुप्स आणि पेजेस आहेत जी ‘दिशाभूल करणारी’, प्रक्षोभक आणि मुस्लिमविरोधी कंटेंटने भरलेली आहेत.

अहवालात म्हटले आहे की, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांच्या लक्षात आले की, त्या काळात त्यांच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर असा मजकूर येत होता, ज्यामुळे संघर्ष, द्वेष आणि हिंसाचार पसरण्याची शक्यता वाढली होती. सध्या फेसबुकने या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दोन्ही समुदायांचे म्हणणे आहे की याआधी असा कंटेंट समोर येत असे ज्यामध्ये, कोविड-19 पसरवण्यासाठी मुस्लिमांना जबाबदार धरण्यात आले होते.

असेही म्हटले गेले होते की मुस्लिम पुरुष हिंदू स्त्रियांना लग्नासाठी लक्ष्य करत होते. अनेक समुदायांनी भीती, शारीरिक हानी किंवा प्रतिकात्मक हानी, कोविडशी संबंधित चुकीची माहिती आणि जातीय हिंसाचाराचे खोटे अहवाल असलेला कंटेंट पाहिला आहे. संशोधकांनी त्यांच्या अहवालात लिहिले आहे की, फेसबुकवरील खाजगी फेसबुक ग्रुपमध्ये समविचारी लोक अधिक विभाजन करणारे, विशेषत: मुसलमानांना लक्ष्य करणारे दाहक कंटेंट पोस्ट करतात.

संशोधकांचे म्हणणे आहे की, दुसर्‍या गटाने हिंसाचाराची चिथावणी दिली, ज्यामध्ये मुस्लिमांना डुक्कर आणि कुत्रा यांसारख्या संज्ञांनी संबोधित केले गेले, तसेच कुराण हिंदू महिलांवर बलात्कार करण्यास सांगते अशी खोटी माहिती पसरवली. असे ग्रुप्स फेसबुकवर सक्रिय राहिले व त्यांना धोकादायक म्हणून वर्गीकृत केले गेले नाही. बर्‍याच वापरकर्त्यांना असे वाटते की, असा कंटेंट प्रसारित होण्यापासून रोखण्याची जबाबदारी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपची आहे. (हेही वाचा: 67th National Film Awards: चित्रपटांमधून हिंसाचार आणि अश्लीलतेला थारा देऊ नये, Venkaiah Naidu चित्रपट निर्मात्यांना आवाहन)

अहवालात म्हटले आहे की, फेसबुकला याची कल्पना आहे की, त्यांच्या व्यासपीठावर लोकांना प्रक्षोभक कंटेंटद्वारे लक्ष्य केले जात आहे आणि फेसबुक आपल्या वापरकर्त्यांचे संरक्षण करत नाही. सप्टेंबर 2021 मध्ये दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सुसंवाद समितीने म्हटले होते की, प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ईशान्य दिल्लीत दंगल भडकवली आहे.