Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

रिलायन्स जिओने (Reliance Jio) बाजारात पाय ठेवल्यापासून एयरटेल, व्होडाफोन, आयडिया अशा कंपन्यांना फार मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. आता ट्रायच्या (TRAI) ताज्या आकडेवारीनुसार जिओने जुलै 2020 मध्ये नवीन 35.54 लाख ग्राहक जोडले आहेत व यासह रिलायन्स जिओ ही 40 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडणारी देशातील पहिली दूरसंचार कंपनी बनली आहे. दुसरीकडे, आपला नवीन ब्रँड लोगो लॉन्च करणाऱ्या व्होडाफोन-आयडियाने 37.26 लाख ग्राहक गमावले आहेत. दरम्यान, भारती एअरटेलने 32.6 लाख ग्राहक आणि बीएसएनएलने 3.88 लाख ग्राहक जोडले आहेत. एमटीएलएनने 5,457 ग्राहक गमावले आहेत.

जूनमध्ये भारतात वायरलेस ग्राहकांची एकूण संख्या 114 कोटी होती, ती जुलैच्या अखेरीस 114.4 कोटींवर पोहोचली आहे, त्यामुळे मासिक वाढीचा दर 0.30 टक्के आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मासिक सबस्क्राइबर अहवालानुसार, जून 2020 पर्यंत भारतातील एकूण दूरध्वनी ग्राहकांची संख्या 116 कोटी होती, ती जुलै 2020 पर्यंत 116.4 कोटींवर पोहोचली आहे. इथे मासिक वाढीचा दर 0.30 टक्के दर्शवितो. अहवालानुसार, रिलायन्स जिओ वायरलेस ग्राहकांच्या बाजारामध्ये 40,08,03,819 सबस्क्राइबरसह आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या 4 वर्षांमध्ये जिओने हे यश मिळवले आहे. (हेही वाचा: Jio च्या 401 रुपयांच्या फ्री रिचार्जच्या नावाखाली फसवणूक, WhatsApp वर असा मेसेज दिसल्यास क्लिक करु नका)

ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असण्यासोबतच रिलायन्स जिओने, पुन्हा एकदा सरासरी 4G डाउनलोड स्पीडमध्ये बाजी मारली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, जिओचे सरासरी डाउनलोड स्पीड 19.3 एमबीपीएस आहे. रिलायन्स जिओ डाउनलोड स्पीडच्या बाबतीत सलग तीन बर्षे अव्वल 4 जी ऑपरेटर आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये भारती एअरटेलच्या कामगिरीमध्ये किंचित सुधारणा झाली.

सप्टेंबरमध्ये एअरटेलचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 7.5 एमबीपीएस होता तर ऑगस्टमध्ये तो 7.0 एमबीपीएस राहिला. रिलायन्स जिओचा स्पीड एअरटेलच्या तुलनेत 2.5 पट जास्त होता. व्होडाफोन आणि आयडिया नेटवर्कच्या सरासरी 4G डाउनलोड स्पीडमध्येही थोडी सुधारणा झाली. सप्टेंबरमध्ये व्होडाफोनचा स्पीड 7.9 एमबीपीएस आणि आयडियाचा 8.3 एमबीपीएस होता.