Whatsapp वर अश्लील व्हिडिओ, धमकी देणारे Message आल्यास घाबरु नका, इथे तक्रार करा
Whatsapp | (Photo credit: archived, edited, representative image)

तुमच्या Whatsapp वर अनोळखी नंबरवरुन अश्लील व्हिडिओ, धमकी देणारे संदेश येत असतील तर अजिबात घाबरु नका. अशा क्रमांकांची तक्रार तुम्ही थेट DOT कडे म्हणजेच दूरसंचार विभागाशी करु शकता. तुमची स्वीकारलेली तक्रार DOT पुढील कारवाईसाठी थेट पोलिसांकडे पाठवेल. ही तक्रार करण्याची पद्धतही अगदीच सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की, तुम्हाला तुमच्या Whatsapp वर संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आणि आलेल्या संदेशाचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. हा स्क्रीनशॉट ccaddn-dot@nic.in या ईमलवर पाठवायचा आहे.

दूरसंचार विभागाचे संचार नियंत्रक (Controller Communications) अशीष जोशी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'जर तुम्हाला घाणेरडे, अश्लील, धमकी देणारे, आक्षेपार्ह संदेश ' Whatsapp द्वारे मिळत असतील तर, असा मोबाईल क्रमांक तसेच मेसेजचा स्क्रीनशॉट आपण 'सीसीएडीडीएन-डीओटी@एनआईसी डॉट इन' वर पाठवा. अशा क्रमांकावर आम्ही जरुर कारवाई करु. (हेही वाचा, WhatsApp वर 'या' कारणामुळे मित्राचे 'Status' प्रथम दिसणार नाही)

अनेक पत्रकार, दिग्गज व्यक्तींनी त्यांना त्यांच्या Whatsapp वर अत्यंत अश्लील, धमकी देणारे आणि घाणेरडे संदेश आल्याच्या तक्रारी केल्या होता. या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. DOT ने 19 फेब्रुवारीला एका आदेशात म्हटले आहे की, Whatsapp किंवा इतर कोणत्याही प्रकारे दूरसंचारसेवेचा वापर करुन लोकांना अश्लील व्हिडिओ, मेसेज, धमकी देणे, अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच, अनधिकृत, चुकीचा मेसेज पाठवण्यावरही बंदी आहे. असे करणाऱ्या व्यक्तीची तक्रार आल्यास दूरसंचार सेवा तत्काळ दखल घेईल.