आपल्याला जेव्हा अनोळखी नंबरवरुन कॉल येते तेव्हा सहाजिकच आपल्या भुवया उंचावल्या जातात. स्क्रिनवर दिसणारा नंबर कोणाचा? हे फोन स्वीकारेपर्यंत आपल्याला कळत नाही. काही थर्ट पार्टी अॅप हे दर्शवण्यास मदत करतात हा भाग वेगळा. पण ते अधिकृत नसतात. त्यामुळे धोका वाढतो. यावर आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एक छान पर्याय घेऊन येत आहे. ट्रायच्या नव्या नियमामुळे आता फोन नंबरसोबत फोन करणाऱ्याचे नावही पाहता येणार आहे.
अनावश्यक फोनमुळे ग्राहक अनेकदा त्रस्त असतात. यात अनेकदा मिस कॉल असतात. यातील काही फोन हे कर्ज देण्यासाठी कॉल करतात तर काही नेटवर्क सेवा देण्यासाठी असतात. अनेक वेळा स्कॅमरचा फोन डोकेदुखीचे कारण बनतो. पण Truecaller मुळे कॉल रिसिव्ह करण्यापूर्वी कोण कॉल करत आहे हे कळू शकते. त्यामुळेच थर्ड पार्टी अॅप अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आहे. मात्र, असे असतानाही शंभर टक्के सेवा मिळणे शक्य नाही.कारण त्यावर समोरच्या व्यक्तीने जे नाव अपडेट केलेले असते तेच दिसते. त्यामुळे निश्चित माहिती मिळत नाही. अशा वेळी ट्रायच्या नव्या सेवेचा चांगलाच फायदा ग्राहकांना होणार आहे. (हेही वाचा, Aadhaar Card Update: मोबाईल नंबर रजिस्टर नसला तरी आता आधारकार्ड करता येणार डाऊनलोड; UIDAI ची नवी सोय)
ट्रायच्या नियमानुसार, टेलिकॉम अपरेटर यांच्याकडे ग्राहकांचे नाव, पत्ते (KYC) असतात. ग्राहकही टेलिकॉम ऑपरेटर्सना सिम घेण्याच्या वेळी वैयक्तिक माहिती देत असतात. या माहितीवरच आधारीत माहितीनुसार ग्राहाकंना फोन आल्यावर तो कोणाचा आहे ते कळणार आहे.
उल्लेखनिय म्हणजे या सेवेचा आणखी एक ग्राहकांना होणारा फायदा म्हणजे, ग्राहकांना ही सेवा केवळ टेलिकॉम कंपनीकडून प्राप्त झालेल्या केवायसी डेटाद्वारेच मिळेल. त्यामुळे कॉल करणाऱ्याची माहिती खरी आहे की नाही, याची पडताळणी करणे शक्य होणार आहे. याशिवाय तुम्ही कोणत्याही स्पॅम कॉलची तक्रार सहजपणे करू शकता.