Elon Musk यांनी ट्वीटरचा कारभार हाती घेतल्यानंतर संस्थेत अनेक बदल केले. त्यापैकी एक म्हणजे ब्लू टिक व्हेरिफिकेशन (Blue Tick Verification) साठी सब्सक्रिप्शन! पूर्वी जी ब्लू टिक विश्वासार्हता दर्शवत होती ती आता व्यावसाय झाली आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून ज्यांनी या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन घेतलं नाही त्यांच्या अकाऊंटसमोर ब्लू टिक राहणार नाही. त्यामुळे सध्या ज्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक दिसत आहे ती 1 एप्रिल नंतर गायब होण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटीज, राजकारणी, पत्रकारांचा समावेश असू शकतो.
ट्वीटरच्या अधिकृत अकाऊंट वरून या ब्लू टिकच्या नव्या धोरणाची माहिती देण्यात आली आहे. आता फक्त पेड सबस्क्रिप्शन विकत घेतलेल्या युजर्सनाचं ट्विटरची ब्लू टिक मिळणार आहे. आतापर्यंत जुन्या युजर्सना ज्यांच्याकडे आधीपासूनच ब्लू टिक आहे त्यांच्या अकाऊंट वरून ब्लू टिक हटवली नव्हती पण आता ती देखील हटवण्यास सुरूवात होणार आहे.
Twitter Verified now available worldwide! https://t.co/SxUhUWJbmR
— Elon Musk (@elonmusk) March 23, 2023
भारतामध्ये ट्वीटर वर ब्लू टिक साठी वर्षाला 9400 रूपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी ब्लू टिक मिळवण्यासाठी अनेकांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या अकाऊंट्सची सविस्तर पडताळणी करून घेतल्यानंतर ब्लू टिक दिली जात होती. यामागे उद्देश असा होता की युजर्सना प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, संस्था ओळखता याव्यात. फ्रॉड, बनावट अकाऊंट्सपासून युजर्स दूर राहतील. पण आता ही ब्लू टिक सब्सक्रिप्शनचे पैसे देणार्या कोणत्याही व्यक्तीला सहज उपलब्ध होणार आहे.
ट्विटर ब्लू आता जगभरात उपलब्ध करण्यात आले आहे. या ब्लू चेकमार्क, द्वारा युजर्सना संभाषणांमध्ये प्राधान्याचं रँकिंग मिळेल, अर्ध्या जाहिराती, लांब ट्विट्स, बुकमार्क फोल्डर, कस्टम नेव्हिगेशन, ट्विट एडिट करण्याची मुभा, ट्विट अनडू करण्याची मुभा मिळणार आहे.
ट्वीटर पाठोपाठ ही सब्सस्क्रिप्शनची पॉलिसी आता मेटा या संस्थेने फेसबूक, इंस्टाग्राम वर देखील लागू केली आहे.