Jio To Enter In UPI Payments: मुकेश अंबानींची जिओ कंपनी लवकरच युपीआय सेगमेंटमध्ये प्रवेश करणार; Paytm आणि PhonePay शी होणार स्पर्धा
Mukesh Ambani | (File Image)

Jio To Enter In UPI Payments: जिओने (Jio) अल्पावधीतच भारतीय दूरसंचार बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. यासोबतच कंपनी वरचेवर नवनवीन बदलही करत असते. आता जिओ धमाकेदारपणे युपीआय (UPI) पेमेंट मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. साधारणपणे तुम्ही दुकानांमध्ये केवळ पेटीएम साउंडबॉक्सच पाहिला असेल, आता  जिओ या साउंडबॉक्सच्या मदतीने आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जिओ साउंडबॉक्सची चाचणी सुरू झाली आहे आणि लवकरच तुम्हाला दुकानांमध्ये ते पाहता येईल. याचा अर्थ लवकरच मुकेश अंबानी यांची थेट स्पर्धा पेटीएम, फोनपे आणि गुगल पेशी होणार आहे.

जेव्हा जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला, तेव्हा देशात मोबाईल कॉलचे दर आणि इंटरनेट महाग होते. मात्र जिओने मोफत इंटरनेट वापरण्याची सुविधा दिली. त्यामुळे देशात इंटरनेटचा वापर तर वाढलाच, पण या क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही बाजारात टिकून राहण्यासाठी त्यांच्या किमती कमी कराव्या लागल्या. यासह तीन मोठे खेळाडू वगळता सर्वांना आपली सेवा थांबवावी लागली.

आता जिओने रिटेल आउटलेटवर साउंडबॉक्स ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. पेटीएम साउंडबॉक्सला हे थेट आव्हान आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पेटीएम यूपीआयवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. मुकेश अंबानी यांच्या जिओ पे ॲप सेवेमध्ये साउंडबॉक्सची भर पडल्याने कंपनीचा युपीआय पेमेंट सेगमेंटमधील सहभाग वाढेल. जिओ लवकरच साउंड बॉक्स बाजारात आणणार आहे. आता ते किरकोळ दुकानांसाठी चाचणी म्हणून सुरू करण्यात आले आहे. त्याची चाचणी अजूनही सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास ती बाजारातही दाखल होऊ शकते.

पेटीएमविरोधात आरबीआयने केलेल्या कारवाईचा फायदा जिओच्या नवीन यूपीआयला होऊ शकतो. दरम्यान, अलीकडेच आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनेही आपली युपीआय सेवा सुरू करण्याची घोषणा केली. कंपनीने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने आपले युपीआय हँडल (@fkaxis) लाँच केले होते.