IBM (PC - Twitter)

एकीकडे, तंत्रज्ञानामुळे लोकांचे काम सोपे होत आहे, तर दुसरीकडे, एआयच्या (AI) वाढत्या वापरामुळे अनेक लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. आता रिपोर्ट्सनुसार, आयबीएमने (IBM) सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बहुतेक नोकरकपात एचआर विभागात झाली आहे, ज्याचे कारण एआय असल्याचे सांगितले जात आहे. आयबीएमने आस्कएचआर (AskHR) नावाची एक नवीन एआय प्रणाली विकसित केल्याचे म्हटले जाते. ज्यामुळे एचआर विभागाची अनेक कामे नवीन प्रणालीद्वारे पूर्ण होत आहेत. ही प्रणाली कर्मचाऱ्यांच्या रजा विनंत्या, तसेच पगार तपशील आणि कर्मचाऱ्यांची कागदपत्रे हाताळण्यास सक्षम आहे.

असे म्हटले जात आहे की, आयबीएमची ही नवीन प्रणाली 94% मानक एचआर कामे स्वयंचलितपणे हाताळू शकते. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची गरज होती. या मंचाने 2024 मध्ये नियमित एचआर कामे यशस्वीपणे हाताळली, ज्यामुळे कंपनीला 3.5 अब्ज डॉलर्सचा उत्पादकता वाढीचा फायदा झाला. आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा म्हणतात की, कंपनीने काही कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन एआय सिस्टीम वापरल्या आहेत. त्यांनी असेही सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उत्पादकता वाढली. ते पुढे म्हणाले, आयबीएममधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्यक्षात वाढली आहे, कारण ऑटोमेशनमधून मिळणारी बचत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मार्केटिंग आणि सेल्स सारख्या व्यवसायाच्या इतर भागांमध्ये गुंतवली जात आहे.

सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि विक्रीसारख्या क्षेत्रात नवीन लोकांना कामावर ठेवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. आयबीएम केवळ नोकऱ्या कमी करत नाही तर काही धोरणात्मक भूमिकांची पुनर्रचना देखील करत आहे. मात्र मानवी हस्तक्षेपाशिवाय ही एआय व्यवस्था पूर्णपणे काम करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. अजूनही काही कामे आहेत ज्यात मानवी हस्तक्षेप आवश्यक आहे. आयबीएमच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी निशेल लॅमोरेक्स म्हणतात की, सध्या खूप कमी भूमिका बदलल्या जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापरामुळे नियमित आणि पुनरावृत्ती होणारी कामे कमी होतील आणि कर्मचाऱ्यांना सर्जनशील कामांवर लक्ष केंद्रित करता येईल. (हेही वाचा: Tech Layoffs 2025: टेक क्षेत्रात 2025 मध्ये 61,000 हून अधिक नोकर कपात; Microsoft, IBM, Google, Amazon सह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले)

आयबीएमचा दावा आहे की, हा बदल फक्त काही उद्देशांसाठी करण्यात आला आहे. जिथे लोकांची गरज आहे तिथे काम थांबवले जाणार नाही आणि लोकांना काढलेही जाणार नाही. एआयचा वापर फक्त काही विशिष्ट भूमिकांमध्ये केला जात आहे. हा बदल केवळ आयबीएमपुरताच मर्यादित नाही. जगभरातील अनेक कंपन्या कामे स्वयंचलित करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी एआय-चालित साधनांचा प्रयोग करत आहेत. गेल्या महिन्यात, ड्युओलिंगोने घोषणा केली की, ते मानवी कंत्राटदारांच्या नोकऱ्या एआयने बदलत आहेत. दरम्यान, 2025 मध्ये केवळ आयबीएमच नाही तर मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन, क्लाउडस्ट्राइक सारख्या अनेक कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या काढून टाकल्या आहेत. जगभरात अशा प्रकारे 61,000 हून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.