BSNL

सुरुवातीला स्वस्त प्लॅनमध्ये चांगले इंटरनेट पॅकेज देऊन ग्राहकांना भुरळ पाडल्यानंतर, आता खासगी टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Companies) आता आपले खिसे भरण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सचे दर वाढवले आहेत. कंपन्यांच्या या पावलामुळे ग्राहक संतप्त झाले असून, सार्वजनिक दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) याचा थेट फायदा होत आहे. बीएसएनएलने काही खास पॅकेजेस लाँच केले आहेत, जे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. आता दररोज 1000 हून अधिक लोक बीएसएनएलला पोर्ट करत आहेत. ज्या ग्राहकांनी बीएसएनएल सिम बंद ठेवले होते त्यांनी आता ते पुन्हा सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे.

अशात जर तुम्हालाही तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बीएसएनएलवर पोर्ट करायचा असेल तर, यासाठी विविध मार्ग आणि अतिशय सोपी प्रक्रिया आहे. या लेखात आपण याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

1.युनिक पोर्टिंग कोड (UPC) मिळवा-

प्रथम, तुम्हाला 1900 वर एसएमएस पाठवून युनिक पोर्टिंग कोड (UPC) प्राप्त करणे आवश्यक आहे. या एसएमएसमध्ये पुढीलप्रमाणे मजकूर नमूद करा- 'Port [space] 10 अंकी मोबाईल नंबर’. जम्मू काश्मीर प्रीपेड ग्राहकांच्या बाबतीत, एसएमएस पाठवण्याऐवजी 1900 वर कॉल करणे आवश्यक आहे.

हा पोर्टिंग कोड फक्त 4 दिवसांसाठी वैध आहे आणि जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि ईशान्य सर्कलमध्ये ही वैधता 15 दिवस असेल. (हेही वाचा: BSNL Recharge Plan Unlimited Calls: बीएसएनएल 4G रिचार्ज प्लॅन: किंमती, फायदे आणि बरेच काही; घ्या जाणून)

2. बीएसएनएल सीएससी/ अधिकृत फ्रँचायझी / किरकोळ विक्रेत्याला भेट द्या-

तुमचा मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी, बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या. या ठिकाणी ग्राहक अर्ज फॉर्म (CAF) भरा आणि प्रक्रियेसाठी पोर्टिंग फी भरा. (सध्या बीएसएनएल बीएसएनएलला पोर्ट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.)

3.नवीन बीएसएनएल सिम कार्ड मिळवा-

अर्ज भरल्यानंतर तुम्हाला नवीन बीएसएनएल सिम कार्ड दिले जाईल.

4.पोर्टिंगसाठी तुमचे नवीन सिम कार्ड बदला-

एकदा पोर्टिंग विनंती मंजूर झाल्यानंतर, बीएसएनएल तुम्हाला पोर्टिंगची तारीख आणि वेळ सूचित करेल. दिलेल्या वेळी तुम्हाला तुमचे सिम कार्ड बदलावे लागेल.

काही अडचण आल्यास, टोल फ्री क्रमांक 1800-180-1503 किंवा 1503 वर संपर्क साधा.

टिप-

पोर्टिंग प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. पोर्टिंग करण्यापूर्वी, तुमच्या विद्यमान सेवा प्रदात्याकडे तुमचे बिल सेटल करा. तसेच तुमचा पोर्टिंग कोड आणि पोर्टिंगची तारीख व वेळेची माहिती सुरक्षित ठेवा.