ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) च्या ग्लोबल सेलिंग प्रोग्राम (Global Selling Programme) अंतर्गत विक्री करणाऱ्या भारतीय लघु व मध्यम उद्योग (Indian MSMEs) आणि ब्रँडची एकूण निर्यात 2 अब्ज डॉलर्सपेक्षा झाली आहे. अॅमेझॉनने सोमवारी ही माहिती दिली. त्यानुसार, अॅमेझॉनने वर्ष 2015 मध्ये जीएसपी सादर केला होता. त्याअंतर्गत भारतीय कंपन्यांना अॅमेझॉनच्या 15 वेबसाइटद्वारे जगभरात आपला माल निर्यात करण्याची संधी मिळते. पूर्वी या प्रोग्राममध्ये काहीच विक्रेते होते ज्यांची संख्या आता वाढून 60,000 च्या वर गेली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये अॅमेझॉनचने 2025 पर्यंत जीएसपीमार्फत एकूण 10 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचे वचन दिले होते.
अॅमेझॉन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंट्री हेड अमित अग्रवाल म्हणाले की, ‘एमएसएमई ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांचे डिजिटलायझेशन करून अॅमेझॉन निर्यातीत वेग वाढविण्यात आणि रोजगार निर्मितीत हातभार लावत आहे. ही गोष्ट देशाच्या समावेशक आर्थिक विकासास सक्षम बनवेल. जीएसपीमार्फत होणारी निर्यात आता 2 अब्ज डॉलर म्हणजेच 30,000 कोटी रुपयांच्या पातळीवर गेली आहे.' अग्रवाल पुढे म्हणाले, 'कोरोना व्हायरसच्या संकटकाळातही या कार्यक्रमामुळे एमएसएमईंना त्यांचा निर्यात व्यवसाय कायम ठेवण्यास मदत झाली. यामुळे शेकडो कुटुंबांना आधार मिळाला.' (हेही वाचा: Infosys ची आतापर्यंतची सर्वात मोठी डील; 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार अमेरिकन कंपनी Vanguard)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, देशाच्या वाढीच्या 30 टक्के आणि भारताच्या निर्यातीत 48 टक्के वाटा एमएसएमई क्षेत्राचा आहे. निर्यात ही सरकारची प्रमुख प्राथमिकता असल्याचे सांगूत ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक यशस्वी होण्यासाठी भारतीय एमएसएमईला पाठबळ देण्यावर आणि निर्यातीचा वाटा 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर भर दिला जात आहे. जीएसपीमार्फत निर्यात केलेल्या उत्पादनांना सूक्ष्म, लहान आणि मध्यम अशी वर्गीकृत केली जाऊ शकते आणि हातमाग, हस्तकला आणि कृषी-एमएसएमईसाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार केले जाऊ शकतात.