देशातील दुसर्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) आतापर्यंतची सर्वात मोठी डील केली आहे. कंपनीचा अमेरिकन गुंतवणूक कंपनी व्हॅनगार्डशी (Vanguard) 1.5 अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार गेल्या आठवड्यात कंपनीने तिमाही निकालाच्या घोषणेच्या एक दिवस आधी या कराराबद्दल माहिती दिली होती. या अहवालानुसार असे मानले जात आहे की, हा करार 10 वर्षांपूर्वीचा आहे आणि या काळात कराराची रक्कम 2 अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. इन्फोसिसची ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील आहे. 2018 मध्ये, कंपनीने व्हेरिजॉनबरोबर करार केला होता, जो 2019 मध्ये 1 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविला गेला.
अहवालानुसार इन्फोसिस या अमेरिकन कंपनीला त्यांच्या रेकॉर्डकीपिंगच्या व्यवसायात मदत करेल. यात सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, प्रशासन आणि संबंधित प्रक्रिया समाविष्ट आहेत. या कराराची घोषणा झाल्यानंतर गेल्या आठवड्यात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली होती. मागील आठवड्यात कंपनीने तिमाही निकाल जाहीर केला जो अपेक्षेपेक्षा खूपच चांगला होता. जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 11.5 टक्क्यांनी वाढून, 4233 हजार कोटी रुपये झाला आहे. कोरोना विषाणू महामारी असूनही, कंपनीने या संपूर्ण आर्थिक वर्षात महसुलात वाढ करून सर्वांना चकित केले आहे. (हेही वाचा: उत्पादनांवर ‘Country of Origin’ नमूद करण्यासाठी Amazon ने सेलर्सना दिली 10 ऑगस्टपर्यंतची मुदत)
कंपनीने निश्चित चलनाच्या बाबतीत महसुलात 0-2 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. या काळात कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 21 ते 23 टक्क्यांच्या श्रेणीत असल्याची शक्यता आहे. वाढलेल्या शेअर्सबाबत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी केल्यामुळे आणि मोठा करार मिळाल्यामुळे उर्वरित वर्षातील कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. ते म्हणाले की, एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या नवीन ग्राहकांची संख्येत 110 नी वाढ झाली आहे.