अमेझॉन (Photo Credit: TNW)

देशातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्या सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून फ्लिपकार्ट (Flipkart), अ‍ॅमेझॉन (Amazon) सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना प्रत्येक उत्पादनावर ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ (Country of Origin) नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता अ‍ॅमेझॉनने सर्व सेलर्सना 10 ऑगस्ट पर्यंत सर्व नवीन आणि सध्या साईट वर उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट लिस्टिंगवर ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ दाखवण्यास सांगितले आहे. याबाबतचा आदेश काही दिवसांपूर्वी डीपीआयआयटीने (DPIIT) ने जारी केला होता. त्यामध्ये सांगितले होते की, प्लॅटफॉर्मवर असलेल्या उत्पादनांवर ते उत्पादन मूळ कोणत्या देशातील आहे याची माहिती देणे अनिवार्य असेल.

आता अ‍ॅमेझॉनने सर्व विक्रेत्यांना याबाबत ईमेल पाठविला आहे. यामध्ये विक्रेत्यांना चेतावणी देण्यात आली आहे की, त्यांनी या आदेशाचे पालन न केल्यास त्यांची लिस्टिंग स्थगित केली जाऊ शकते. याचा हेतू चीनमधून येणाऱ्या गोष्टींची आयात कमी करणे हा आहे. कंपनीचा आदेश क्लाउडटेल इंडिया आणि एपेरिओ रिटेल यांनाही लागू होईल, ज्यांच्या होल्डिंग कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनची भागीदारी आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये या दोन विक्रेत्यांचा एकत्रित महसूल 17,000 कोटी रुपये होता. अ‍ॅमेझॉनने ईमेलमध्ये म्हटले आहे की, उत्पादनांवर मूळ देशाची माहिती देणे 21 जुलैपासून गरजेचे असेल व याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. (हेही वाचा: Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना प्रत्येक उत्पादनावर ‘Country of Origin’ नमूद करणे बंधनकारक)

दरम्यान, 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत मिशन'ला बढावा देण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय ई-मार्केटप्लेस (GeM) वर उत्पादनाची नोंदणी करण्यासाठी, 'मूळ देशाचा' उल्लेख करणे आवश्यक असेल. GeM वर हे नवीन फिचर येण्यापूर्वी ज्यांनी आपली उत्पादने यापूर्वीच अपलोड केली होती, त्यांना मूळ देश अपडेट करण्यासाठी नियमितपणे आठवण करून दिली जात आहे. जर उत्पादनांवर मूळ देशाची माहिती नसेल तर, त्यांची उत्पादने GeM वरून काढून टाकली जातील, असे सांगितले होते. अशाप्रकारे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मानिरभर भारत’ ला प्रोत्साहन देण्यासाठी GeM ने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.