Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना प्रत्येक उत्पादनावर ‘Country of Origin’ नमूद करणे बंधनकारक; DPIIT कडून 1 ऑगस्ट पर्यंतची मुदत
Logos of Flipkart and Amazon (Photo Credits: Twitter)

फ्लिपकार्ट (Flipkart). Amazon सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना प्रत्येक उत्पादनावर ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ (Country of Origin) नमूद करणे बंधनकारक असणार आहे. डीपीआयआयटीने (DPIIT) ई-कॉमर्स कंपन्यांना सांगितले आहे की, त्यांच्या प्लॅटफॉर्म उपलब्ध असलेल्या उत्पादनांवर ते उत्पादन मूळ कोणत्या देशातील आहे याची माहिती देणे अनिवार्य असेल. ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्रत्येक उत्पादनावर 'कंट्री ऑफ ओरिजिन' नमूद करण्याच्या लिस्टिंगसाठी सरकारने 1 ऑगस्टपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. परंतु पोर्टलवरील सध्या उपल्स्ब्ध असणाऱ्या उत्पादनांसाठी अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. मात्र, आजच्या बैठकीत डीपीआयआयटीने सप्टेंबर अखेर नियमांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

आता 1 ऑगस्टपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व उत्पादनांवर मूळ देशाची माहिती द्यावी लागेल. गेल्या महिन्यात गलवान व्हॅली येथे झालेल्या झटापटीनंतर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी वाढली आहे. याच भावनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोर्टलवर लाखो उत्पादने असल्याने ई-कॉमर्स कंपन्या यासाठी किमान 3 महिन्यांचा अवधी मागत आहेत. डीपीआयआयटीने उत्पादनाच्या देशाविषयी माहिती देणे आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

बुधवारी दुपारी झालेल्या बैठकीत सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या सर्व कंपन्या सरकारच्या निर्णयामुळे खूश आहेत. डीपीआयआयटीने गेल्या आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांना कायदेशीर मेट्रॉलॉजी (Packaged Commodities) नियमांचे 'लवकरात लवकर पालन' करण्यास सांगितले होते. 2017 मध्ये, सर्व पॅकेज केलेल्या वस्तूंवर त्या उत्पादनाचा तपशील, जसे की उत्पादनाचा मूळ देश, दर्शवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली गेली. (हेही वाचा: Amazon India देणार तब्बल 20,000 लोकांना नोकऱ्या; 12 वी पास करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर)

'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत मिशन'ला बढावा देण्यासाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय ई-मार्केटप्लेस (GeM) वर उत्पादनाची नोंदणी करण्यासाठी, 'मूळ देशाचा' उल्लेख करणे आवश्यक असेल. GeM वर हे नवीन फिचर येण्यापूर्वी ज्यांनी आपली उत्पादने यापूर्वीच अपलोड केली होती, त्यांना मूळ देश अपडेट करण्यासाठी नियमितपणे आठवण करून दिली जात आहे. जर उत्पादनांवर मूळ देशाची माहिती नसेल तर, त्यांची उत्पादने GeM वरून काढून टाकली जातील, असे सांगितले होते. अशाप्रकारे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मानिरभर भारत’ ला प्रोत्साहन देण्यासाठी GeM ने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.