खुशखबर! Amazon India देणार तब्बल 20,000 लोकांना नोकऱ्या; 12 वी पास करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची प्रकरणे समोर यायला सुरुवात झाल्यावर सरकारने लॉक डाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर आता तीन महिन्यानंतर यामध्ये शिथिलता आणली आहे. या दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर कित्येकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशात ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाने (Amazon India) रविवारी म्हटले आहे की, ते सुमारे 20,000 लोकांना नोकऱ्या देणार आहेत. अ‍ॅमेझॉन तात्पुरत्या स्वरूपात 20,000 लोकांना कामावर घेणार आहे. ही भरती कस्टमर सर्विस विभागात असणार आहे, जेणेकरुन भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल.

कंपनीचा अंदाज आहे की, येत्या 6 महिन्यांत ग्राहकांचे ऑनलाईन शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढणार आहे, त्यासाठी आधीच आवश्यक ती तयारी करावी कंपनी करत आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद, पुणे, कोयंबटूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगलोर, इंदूर, भोपाळ आणि लखनऊ येथे या नोकर्‍या उपलब्ध असतील. यापैकी बहुतेक पदे अ‍ॅमेझॉनच्या 'व्हर्च्युअल ग्राहक सेवा प्रोग्रॅम' (Virtual Customer Service program) अंतर्गत असतील, ज्यामध्ये घरून काम करण्याची सुविधा असेल. या पदांवर नियुक्त केलेल्या व्यक्तीचे काम असोसिएट सपोर्ट कस्टमर सर्व्हिसचे असेल, जे ई-मेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोनद्वारे ग्राहकांना मदत करतात. या पदांसाठी किमान पात्रता बारावी पास अशी आहे. तसेच अर्जदाराला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू किंवा कन्नड भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (हेही वाचा: फ्लिपकार्टने सुरु केली विमान तिकीट बुकिंग सेवा; डोमेस्टिक व आंतरराराष्ट्रीय फ्लाईट्ससाठी मिळत आहे भरघोस सुट, See Offers)

अ‍ॅमेझॉन इंडियाने असेही म्हटले आहे की, ही तात्पुरती पोस्ट उमेदवारांच्या कामगिरीवर आणि व्यवसायाच्या गरजेनुसार कायमस्वरुपी पोस्टमध्ये रुपांतरित केली जाऊ शकतात. या विषयी कोणताही निर्णय या वर्षाच्या अखेरीस घेण्यात येईल. याबाबत बोलताना अ‍ॅमेझॉन इंडियाचे संचालक (ग्राहक सेवा) अक्षय प्रभू म्हणाले, ‘ग्राहक सेवेच्या क्षेत्रात आम्ही नव्याने नोकऱ्या देण्याच्या गरजांचे मूल्यांकन करीत आहोत. हा निर्णय ग्राहकांच्या वाढती मागणीच्या आधारे घेतला जात आहे. भारत आणि इतर देशांमध्ये सुट्टीचा हंगाम सुरू होणार असल्याने, येत्या 6 महिन्यांत ग्राहकांची मागणी वाढणार असल्याचा आमचा अंदाज आहे. त्यामुळेच सध्या कंपनी नवीन लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देत आहे.’