![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/22-2-1.jpg?width=380&height=214)
कोणत्याही देशासाठी, त्याचा डेटा सध्या इंधन आणि सोन्यापेक्षा महाग आहे. अनेक देश त्याच्या सुरक्षेसाठी अनेक पावले उचलत आहेत. भारतदेखील डेटा सुरक्षेसाठी अनेक उपयोजना राबवत आहे. जगाने एआयमध्ये प्रवेश केला आहे, अशा परिस्थितीत, जगभरातील सर्व देश डेटा सुरक्षिततेबाबत अधिक सावध झाले आहेत. अलिकडेच चीनचे (China) डीपसीक (Deepseek) लाँच करण्यात आले. चॅटजीपीटी (ChatGPT) आणि जेमिनी सारखे चॅटबॉट्स आधीच बाजारात आहेत. या परिस्थितीमध्ये देशाच्या अर्थ मंत्रालयाने, सरकारी कागदपत्रे आणि डेटा गोपनीयतेला धोका असल्याचे सांगून, सर्व सरकारी विभागांनी ऑफिसशी संबंधित कामांसाठी तसेच ऑफिसच्या डिव्हाइसवर चॅटजीपीटी आणि डीपसीकसह इतर एआय सॉफ्टवेअर वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारतात येण्यापूर्वी सरकारने हा इशारा दिला आहे. भारतात, ऑल्टमन आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑल्टमन फायरसाइड चॅटमध्ये सहभागी होतील. ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या देशांनीही डीपसीकच्या वापरावर डेटा सुरक्षा चिंतेमुळे अशाच प्रकारच्या निर्बंधांची अंमलबजावणी केली आहे.
सरकारच्या चिंता-
सरकारचा असा विश्वास आहे की या साधनांमुळे संवेदनशील डेटा लीक होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीयतेला हानी पोहोचू शकते. भारतात चॅटजीपीटी, डीपसीक, गुगल जेमिनी यासारख्या परदेशी एआय अॅप्सचा वापर वेगाने वाढत आहे. वापरकर्ते त्यांचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी या अॅप्सचा वापर करत आहेत. मात्र, या अॅप्सच्या वापरादरम्यान डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अॅप्सना आवश्यक परवानग्या आणि वापरकर्त्यांच्या डिव्हाइसमध्ये असलेल्या डेटामध्ये प्रवेश आवश्यक असतो, ज्यामुळे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका वाढतो.
सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, चॅटजीपीटी आणि डीपसीक सारखे एआय प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा डेटा साठवू शकतात आणि तो तृतीय पक्षांसोबत शेअर करू शकतात. हा डेटा सरकारी कामाशी संबंधित संवेदनशील माहिती असू शकतो, जी लीक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय, या साधनांद्वारे निर्माण होणाऱ्या माहितीच्या अचूकतेवर आणि विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. (हेही वाचा: India’s First AI University: महाराष्ट्रात उभे राहणार देशातील पहिले 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विद्यापीठ; ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी राज्य सरकारने गठीत केली समिती)
कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना-
सरकारने सर्व मंत्रालये आणि विभागांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना या एआय टूल्सचा वापर करण्यापासून रोखण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सरकारी कामात एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत एक व्यापक धोरण तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. सरकारचा असा विश्वास आहे की एआय टूल्स वापरण्यापूर्वी, त्यांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित मानके स्पष्ट करणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञान तज्ञांचे म्हणणे आहे की सरकारचे हे पाऊल योग्य दिशेने उचलले गेले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की एआय टूल्सच्या वाढत्या वापरामुळे डेटा गोपनीयता आणि सायबर सुरक्षेशी संबंधित धोके देखील वाढत आहेत.
एआय अॅप्सची लोकप्रियता-
चॅटजीपीटी, डीपसीक आणि गुगल जेमिनी सारख्या एआय अॅप्सनी त्यांच्या उपयुक्ततेमुळे भारतात वेगाने लोकप्रियता मिळवली आहे. ही अॅप्स वापरकर्त्यांना कंटेंट निर्मिती, डेटा विश्लेषण, कोडिंग, भाषा भाषांतर आणि इतर अनेक कामांमध्ये मदत करतात. विद्यार्थी तसेच व्यावसायिकांमध्ये या अॅप्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. मात्र एआय टूल्सच्या वाढत्या वापरासह, त्यांच्याशी संबंधित धोके समजून घेणे आणि नियंत्रित करणे महत्वाचे आहे.