Artificial Intelligence | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

India’s First AI University: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. हे तंत्रज्ञान आता हळूहळू आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात एआयची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे. अशा स्थितीत याबाबत माहिती व शिक्षण मिळणे गरजेचे झाले आहे. म्हणूनच आता महाराष्ट्रात याची तयारी सुरू झाली आहे. देशातील पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रात उभे राहणार आहे. त्याची ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. एआयमधील नवीन शोधांना प्रोत्साहन देणे आणि त्याचा देशभरात प्रसार करणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.

राज्यात देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची योजना आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मंत्री शेलार यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितले की, हे विद्यापीठ एआय आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना देईल आणि उत्कृष्टतेचे केंद्र असेल. या विद्यापीठामुळे उद्योग, शिक्षण आणि सरकार यांच्यातील सहकार्याला चालना मिळेल. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत घेण्यात येत आहे. या विद्यापीठात केवळ शिक्षणच नाही तर एआयशी संबंधित नवीन तंत्रज्ञानही विकसित केले जाणार आहे.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये शिक्षण, उद्योग आणि सरकारमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. टास्क फोर्स एआय शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करणारी संस्था तयार करण्यासाठी काम करेल. हा उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याशी सुसंगत आहे, ज्यामध्ये विकासासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात आला होता. विद्यापीठ एआय आणि संबंधित क्षेत्रात संशोधन आणि विकासाला चालना देईल. तसेच कौशल्य विकास, तंत्रज्ञान नवकल्पना आणि धोरणनिर्मितीवर भर दिला जाईल. (हेही वाचा: Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात Artificial Intelligence वर अधिक भर, 500 कोटी रुपयांची तरतूद, स्थापन करणार तीन AI Centres of Excellence)

या टास्क फोर्सचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव करतील. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मुंबईच्या संचालकांचा समावेश आहे. तसेच गुगल इंडिया, महिंद्रा ग्रुप आणि L&T सारख्या संस्थांचे प्रतिनिधी आणि भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी यांचाही समावेश आहे. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन आणि डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे तज्ज्ञदेखील या टास्क फोर्समध्ये सामील आहेत.