'जिओ'मुळे इतर मोबाईल कंपन्यांना आर्थिक फटका; मोफत ‘इनकमिंग कॉल’ होणार बंद?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

गेल्या काही वर्षांपासून भारतातील टेलिकॉम सेक्टरमध्ये अमुलाग्र बदल घडला आहे. फ्री इंटरनेट पासून ते 4 जी नंतर आता 5 जीची तयारी, या सर्व गोष्टी इतक्या वेगाने घडल्या की भारतातील क्वचितच असे एखादे खेडेगाव असेल जिथे मोबाईल सेवा पोहचली नसेल. या सर्व गोष्टींचे श्रेय जाते ते जिओ (Jio)ला. भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने आपला पाय ठेवल्यानंतर कित्येक कंपन्यांनी बाजारातून काढता पाय घेतला. तर आज काही कंपन्या एकमेकांच्या साथीने जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मोफत कॉल्सची सुविधा आणि अतिशय कमी किंमतीमधील इंटरनेट या दोन गोष्टींमुळे जिओने बाजारात आपले बळकट स्थान निर्माण केले. यावर जिओला टक्कर देण्याचा उपाय म्हणून इतर टेलिकॉम कंपन्यांनीदेखील हा फंडा वापरायला सुरुवात केली. मात्र यामुळे अशा कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी आता कंपन्यांनी ‘इनकमिंग कॉल’साठी शुल्क आकारण्याची तयारी सुरु केली असल्याचे समजत आहे.

एके काळी मोबाईल कंपन्या आऊटगोइंगसोबतच, इनकमिंगसाठी शुल्क आकारत होत्या. मात्र जिओने बाजारात पाय रोवायला सुरुवात केल्यानंतर हे शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले. मात्र यामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांचे फारच आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मोफत इनकमिंग कॉल सुविधा न देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत या कंपन्या आहेत. यासाठी एअरटेलने आपले नवीन 35, 65 आणि 95 रुपयांचे प्लान्स बाजारात आणलेदेखील आहेत.

या गोष्टीचा फटका खेडेगावातील लोकांना जास्त बसण्याची शक्यता आहे. आजही खेड्यातील मोबाईल धारक त्यांच्या इनकमिंग कॉल्सवर अवलंबून आहेत. जास्तीत जास्त 10-20 रुपयांचा रिचार्ज हा त्यांचा' महिन्याचा मोबाईलचा खर्च आहे. त्यामुळे इनकमिंग कॉल्ससाठी स्वतंत्र पैसे भरणे अशांसाठी नक्कीच अवघड ठरणार आहे.