सहसा, लोक ई-कॉमर्स वेबसाइटवर किंवा ऑनलाइन खरेदी करताना त्या उत्पादनाबाबत रिव्ह्यूज (Reviews) नक्की वाचतात. रिव्ह्यू पाहूनच लोक ते उत्पादन कसे आहे आणि लोकांनी त्याबाबत काय कमेंट्स केल्या आहेत व पुढे ते उत्पादन विकत घ्यायचे का नाही ते ठरवतात. अशा परिस्थितीत, आपणही रिव्ह्यू वाचून उत्पादन खरेदी करत असल्यास काळजी घ्या. बनावट रिव्ह्यूचे (Fake Reviews) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. बर्याच वेबसाइट्स ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर (Amazon) उत्पादनांसाठी खोटे रिव्ह्यूज विकत आहेत. कंपन्या बनावट रिव्ह्यूज लिहिण्यासाठी पैशांसह इतर अनेक प्रकारची प्रलोभने देत आहेत. यापूर्वीही खोट्या रिव्ह्यूजची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
युकेस्थित कंज्युमर ग्रुप विचचे म्हणणे आहे की, बर्याच वेबसाइट्स अॅमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी बनावट रिव्ह्यूज विकत असतात. बीबीसीच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, विचच्या माहितीनुसार या बनावट रिव्ह्यूजची किंमत प्रती रिव्ह्यू £ 5 इतकी आहे. काही वेबसाइट्स मोठ्या प्रमाणात असे बनावट रिव्ह्यूज विकतात. इतकेच नव्हे तर बनावट रिव्ह्यूजच्या मोबदल्यात ई कॉमर्स वेबसाइट्स लोकांना विनामूल्य उत्पादने देण्याचे आश्वासन देतात असेही संशोधनात आढळून आले आहे.
त्याचबरोबर अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आम्ही बनावट रिव्ह्यूज काढून टाकत आहोत आणि अशा कामात गुंतलेल्यांवरही कारवाई करत आहोत. विचने केलेल्या संशोधनानुसार विक्रेते हे बनावट रिव्ह्यूज 15 पौंडात खरेदी करू शकतात, तर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यास त्याचे पॅकेजेस 620 पौंड (50 रिव्ह्यूज) पासून सुरू होऊन ते 8,000 पौंड (1,000 रिव्ह्यूज) पर्यंत जाऊ शकते. (हेही वाचा: Vodafone Idea ने लॉन्च केला अनलिमिटेड नाइट टाइम डेटा, युजर्सला मिळणार काही खास बेनिफिट्स)
गेल्या वर्षीही अशा बनावट रिव्ह्यूजचे प्रकरण समोर आले होते. त्या अहवालात असे म्हटले आहे की, काही चिनी कंपन्या पैसे देऊन अॅमेझॉनवर त्यांच्या वस्तूंचे खोटे रिव्ह्यूज टाकत आहेत. रिव्ह्यू लिहिणाऱ्या एका व्यक्तीने सुमारे तीन महिन्यांत बनावट रिव्ह्यूज लिहून किमान 19 लाख रुपये कमावले होते. या अहवालात असे सांगितले गेले आहे की, कंपन्या अथवा लोक प्रथम उत्पादने विकत घेतात व नंतर अॅमेझॉनवर अशा उत्पादनांना 5 स्टार रेटिंग देतात. नंतर अॅमेझॉन त्यांच्या खात्यामध्ये उत्पादनांचे पैसे जमा करते.