Gleeden (Photo Credits: IANS)

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डेटिंग अॅप्सच्या (Dating Apps) वापरामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना विषाणू महामारीमध्ये विवाहबाह्य डेटिंग अॅप्सच्या वापराकडे लोकांचा कल दिसून आला. आता फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग अॅप ‘ग्लीडेन’ने (Gleeden) सोमवारी जाहीर केले की त्यांचे जगभरात 10 दशलक्ष वापरकर्ते झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 दशलक्ष युजर्स हे एकट्या भारतातील आहेत. सप्टेंबर 2022 पासून भारतीय वापरकर्त्यांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीने म्हटले आहे की, यातील बहुतेक नवीन युजर्सहे (66 टक्के) टियर 1 शहरांमधून आले आहेत, उर्वरित (44 टक्के) टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून आले आहेत. ग्लीडेन हे विवाहित लोकांसाठी जगातील पहिले विवाहबाह्य संबंध डेटिंग अॅप आहे. हे अॅप 2009 मध्ये फ्रान्समध्ये लाँच करण्यात आले आणि 2017 मध्ये भारतात आले.

ग्लीडनचे भारताचे कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारत असा देश आहे जिथे अॅपवरील वापरकर्त्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. 2022 मध्ये 18 टक्क्यांहून अधिक नवीन वापरकर्ते हे अॅप वापरू लागले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये ही संख्या 1.7 दशलक्ष होती, जी आता 2 दशलक्षांपेक्षा जास्त झाली आहे. (हेही वाचा: Reliance Jio 5G Network: भारतामधील 100 हून अधिक शहरांमध्ये पोहोचली 5जी सेवा; जाणून घ्या महाराष्ट्रात कुठे सुरु आहे)

हे अॅप विशेषतः विवाहित लोकांसाठी डिझाइन केले गेले आहे. ग्लीडनवरील भारतीय वापरकर्त्यांची वाढ हे प्रतिबिंबित करते की, देशातील एकपत्नीत्वाच्या पारंपारिक संकल्पना हळू हळू बदलत आहेत. अनेक जोडपी एकमेकांच्या सहमतीनेही हे अॅप वापरत आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की, ग्लीडनवरील बहुतेक भारतीय वापरकर्ते हे हाय प्रोफाइल आहेत. यातील पुरुष आणि स्त्रिया दोघेही अभियंते, उद्योजक, सल्लागार, व्यवस्थापक, अधिकारी आणि डॉक्टर असे व्यावसायिक आहेत.

भारतामधील ग्लीडन युजर्समध्ये मोठ्या संख्येने गृहिणींचाही समावेश आहे. वयोमानानुसार, अॅपवरील पुरुष बहुतेक 30 पेक्षा जास्त आहेत तर महिला 26 पेक्षा जास्त आहेत. कंपनीने सांगितले की हे अॅप महिलांसाठी अतिरिक्त सुरक्षित केले गेले आहे आणि अशा प्रकारे 2023 मध्ये 60 टक्के पुरुष वापरकर्त्यांच्या तुलनेत 40 टक्के महिला वापरकर्ते असतील. दरम्यान, नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात, ग्लीडनचे सर्वाधिक युजर्स हे मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, लखनौ, नोएडा, नागपूर, सुरत आणि भुवनेश्वर या शहरांतील होते.