CryptBot Malware: मालवेअरद्वारे लाखो क्रोम ब्राउझर युजर्सच्या डेटाची चोरी; Google ने मोठी कारवाई करत केले ब्लॉक
Google (PC - Pixabay)

सायबर हल्ल्यांपासून (Cyberattacks) आपल्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात, गुगलने (Google) कुख्यात CryptBot मालवेअर ब्लॉक केले आहे. कंपनीचा दावा आहे की, या मालवेअरद्वारे मागील काही वर्षात लाखो क्रोम (Chrome) ब्राउझर वापरकर्त्यांकडून त्यांचा डेटा चोरला गेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, CryptBot हा मालवेअरचा एक प्रकार आहे, ज्याला सहसा 'इन्फोस्टीलर' (Infostealer) म्हणून संबोधले जाते.

हे मालवेअर खास संगणकांवरून संवेदनशील माहिती ओळखून ती चोरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या माहितीमध्ये क्रेडेन्शियल्स, सोशल मीडिया खाते लॉगिन, क्रिप्टोकरन्सी वॉलेट आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. पुढे CryptBot द्वारे चोरलेला डेटा छाटला जातो आणि त्यातील उपयोगी माहिती डेटा उल्लंघन मोहिमांमध्ये (Data Breach Campaigns) वापरण्यासाठी लोकांना विकली जाते. गुगलने सांगितले की, हे मालवेअर गुगल क्रोम आणि गुगल अर्थ प्रो (Google Earth Pro) सारख्या सुधारित अॅप्सद्वारे पसरले गेले होते.

मालवेअरने या गेल्या वर्षी अंदाजे 6,70,000 संगणकांमध्ये प्रवेश केला आणि डेटा चोरण्यासाठी मुख्यत्वे गुगल क्रोमच्या वापरकर्त्यांना लक्ष्य केले. आता गुगलने या मालवेअरच्या पाकिस्तानमधील वितरकांना शोधून काढून मालवेअरवर कारवाई केली. या CryptBot च्या अनेक प्रमुख वितरकांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केल्यानंतर, टेक जायंटने बुधवारी पुष्टी केली की त्यांनी इन्फोस्टीलर मालवेअर पसरविण्याची विकासकांची क्षमता मर्यादित करणारा तात्पुरता न्यायालयाचा आदेश प्राप्त केला आहे. गुगलने सांगितले की, 'आमचा खटला CryptBot च्या अनेक प्रमुख वितरकांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे, आम्हाला विश्वास आहे की ते पाकिस्तानमध्ये आहेत आणि जगभरात गुन्हेगारी उपक्रम चालवतात.’ (हेही वाचा: TRAI New Rules: खुशखबर! आता मोबाईल फोन्सवर Fake Calls आणि SMS ला बसणार आळा; 1 मे पासून होणार मोठा बदल, घ्या जाणून)

गुगलने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, क्रिप्टबॉटचा प्रसार रोखण्यासाठी, न्यायालयाने वितरक आणि त्यांच्या पायाभूत सुविधांविरुद्ध तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश मंजूर केला आहे. यूएस मधील न्यू यॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्यातील फेडरल न्यायाधीशाने दिलेल्या आदेशाने, गुगलला CryptBot मालवेअरच्या वितरणाशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातील डोमेन काढून टाकण्याची परवानगी दिली आहे.