Chandrayaan 2 चा अंतिम टप्पा सुरू; चंद्रावर कधी, कसं उतरणार ISRO चं चांद्रयान?
चंद्रयान-2 (Photo Credits: ISRO Video)

चांद्रयान 2 (Chandrayaan 2 ) ने आज ऐतिहासिक टप्पा पार केल्यानंतर ISRO च्या वैज्ञानिकांसोबतच आता अनेक भारतीयांना हे यान चंद्राच्या भूमीवर कधी उतरणार याची उत्सुकता लागली आहे. आज सकाळी सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश (Lunar Orbit Insertion) केला आहे. लवकरच अंतिम टप्पा पार करून चांद्रयान 2 येत्या 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. भारताच्या या चांद्रमोहिमेकडून भारतीय शास्त्रज्ञ आणि ISRO ला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे चंद्रावर उतरणार्‍या चांद्रयान 2 चा हा क्षण पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील इस्त्रोच्या कार्यालयात पोहचणार आहेत. Chandrayaan-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, वैज्ञानिकांसाठी महत्वाचा दिवस

चांद्रयान 2 चंद्रावर कसं उतरणार?

चांद्रयान 2 चे लँडर, ऑर्बिटरपासून वेगळं होईल. त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत जाईल. पुढे चंद्राच्या दिशेने जाऊन 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरणार आहे. बंगळुरू मध्ये इंडियन डिप स्पेस नेटवर्कच्या मदतीने मिशन ऑपरेशन्स कॉप्लेक्स तंत्रज्ञानाचा वापर करून चांद्रयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम सुरू आहे. चांद्रयानाची परिक्रमा 21 ऑगस्ट 2019 ला दुपारी साडेबारा ते दीडपर्यंत पूर्ण होणार आहे.

चांद्रयान 2 चे लॅन्डर 7 सप्टेंबर 2019 च्या रात्री 1 वाजून 55 वाजता लॅन्डर चंद्रावर उतरणार आहे. 2 सप्टेंबर दिवशी लॅन्डर, ऑर्बिटरपासून वेगळं होणार आहे.

ISRO प्रमुखांची पत्रकार परिषद 

चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर होते. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLV MK III)या प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण झाले. भारताची ही चांद्र मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा अमेरिका ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. श्रीहरीकोटा येथून 22 जुलै दिवशी चांद्रयान 2 अवकाशामध्ये झेपावले होते.