जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपल (Apple) आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण उत्पादनांसाठी ओळखली जाते. बाजारात अॅपलची iPhone, iMac, iPad, AirPods, Apple TV, Apple Watch अशी अनेक उत्पादने लोकप्रिय ठरली आहेत. आता बाजारात अॅपल स्नीकर्स विकले (Apple Sneakers) जात आहेत. हे खास बनवलेले अॅपल स्नीकर्स सुमारे 42 लाखात खरेदी केले जाऊ शकतात. हे शूज बाजारात उपलब्ध नाहीत आणि ते फक्त लिलावाद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे हे स्नीकर्स कधीही सामान्य लोकांना विकले गेले नाहीत. ते केवळ अॅपल कर्मचार्यांसाठी कस्टम-मेड होते.
तर या स्नीकर्सबद्दल बोलायचे तर, 80 च्या दशकात अॅपलच्या कर्मचार्यांसाठी हे स्नीकर्स बनवले होते. त्यावेळी अॅपल एखाद्या विशिष्ट ब्रँडला काही विशेष उत्पादनांसाठी स्वतःच्या ब्रँडने नाव वापरण्याची परवानगी देत असे. अशा कंपन्यांमध्ये होंडा, ब्रॉनसारख्या टॉप कंपन्यांचा समावेश होता. तर असेच अॅपल कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी कस्टम-मेड स्नीकर्स बनवण्यासाठी ओमेगा स्पोर्ट्ससोबत भागीदारी केली होती. त्यावेळी हे स्नीकर्स बनवले गेले होते.
या स्नीकर्सवर अॅपलचा जुना इंद्रधनुष्य लोगो देखील कोरलेला आहे. यामुळे हे शूज अजून खास बनतात. तर हे खास कंपनीच्या कर्मचार्यांसाठी तयार केलेले शूज 90च्या दशकात राष्ट्रीय विक्री परिषदेत भेट म्हणून दिले गेले होते. मात्र ते कधीच सर्वसामान्यांसाठी बाजारात आणले गेले नाहीत. सध्या हे शूज फार दुर्मिळ आहेत. म्हणूनच लोक त्यांना विकत घेण्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार आहेत. (हेही वाचा: Elon Musk Renames Twitter To 'X': ट्विटर हँडलचा लोगो बदलला; फ्लाइंग बर्डच्या जागेवर आता दिसणार X)
आता या स्नीकर्सचा सोथबीज लिलाव करत आहे. त्याबाबत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे स्नीकर्स US $ 50,000 (भारतीय चलनात सुमारे 42 लाख रुपये) मध्ये लिलावासाठी सूचीबद्ध केले गेले आहेत. मात्र, लिलावादरम्यान, खरेदीदार अधिक बोली लावू शकतात. नुकतेच ऍपलचा फर्स्ट जनरेशन आयफोन एका लिलावात दीड कोटींहून अधिक किमतीत विकत घेण्यात आला होता.