Airtel Data Leak: 25 लाख एअरटेल वापरकर्त्यांचा फोन-आधार नंबर लीक झाल्याचा हॅकर गटाचा दावा; कंपनीने दिले 'हे' स्पष्टीकरण
Bharti Airtel. (Photo Credits: Twitter)

व्हॉट्सअ‍ॅच्या नवीन प्रायव्हसी धोरणाबाबतचा विवाद अजूनही भारतात थांबलेला नाही आणि आता मोबाईल ग्राहकांच्या डेटा लीकची (Data Leak) मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोट्यवधी मोबाईल वापरणाऱ्या लोकांचा नंबर लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एअरटेल (Airtel) वापरकर्त्यांच्या फोनची माहिती लीक झाली असल्याची माहिती मिळत आहे. रेड रॅबिट टीम (Red Rabbit Team) नावाच्या हॅकर गटाने दावा आहे की लाखो एअरटेल वापरकर्त्यांचे मोबाईल नंबर ऑनलाईन लिक झाले आहेत. यामध्ये आधार क्रमांक आणि पत्ता यांसारख्या वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचाही समावेश आहे.

हॅकर्सनी 25 लाखाहून अधिक एअरटेल वापरकर्त्यांचा डेटा लीक केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे देशभरातील एअरटेल वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आहे जी त्यांना विकायची आहे. परंतु हा हॅकर गट नेमका कुठे आहे हे स्पष्ट झाले नाही. इंडिया टुडे टेकच्या अहवालानुसार, त्यांनी संपूर्ण डेटा डंप पाहिला आणि या घटनेची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये बरेच नंबर्स हे एअरटेल ग्राहकांचे आहेत. यात टेलिफोन क्रमांकासह वैयक्तिक माहितीही आहे. वेबवर विक्रीसाठी ग्राहकांचा पत्ता, शहर, आधार कार्ड नंबर आणि जेन्डर अशी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. रेड रॅबिट टीम हॅकर्सकडे एअरटेलच्या 25 लाखाहून अधिक वापरकर्त्यांची माहिती आहे.

या डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर एअरटेलचे निवेदन समोर आले आहे. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी आपण वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, कंपनीच्या वतीने कोणतेही डेटा उल्लंघन झालेले नाही. एअरटेलने म्हटले आहे की, हॅकर ग्रुपने केलेला हा दावा पूर्णपणे सत्य नाही, कारण यापैकी बहुतेक डेटा एअरटेलचा नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

इंटरनेट सुरक्षा संशोधक राजशेखर राजाहरिया यांनी ही सर्व माहिती दिली आहे. असा दावा केला जात आहे की, हॅकर्सच्या रेड रॅबिट टीमने एअरटेलच्या सुरक्षा पथकांशी संवाद साधला आणि नंतर कंपनीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यातून 3500 डॉलर्स बिटकॉइन काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांनी हा डेटा वेबसाइटवर विक्रीसाठीचा अपलोड केला. वेबसाइट तयार करून वापरकर्त्यांच्या डेटाचा नमुनाही त्यांनी दाखविला. (हेही वाचा: फोनमधील 'या' 5 सेटिंग्स लगेच करा अपडेट, हॅकिंग आणि फसवणूकीला बळी पडण्यापासून होईल बचाव)

आता हेही समोर आले आहे की, एअरटेलच्या सिस्टम किंवा सर्व्हरवरून डेटा लीक झालेला नाही. त्याऐवजी, ती इतर स्त्रोतांद्वारे ही माहिती लीक झाली असावी.