चंद्रयान-2 (Photo Credits: ANI)

अखेर काल इस्रोचा (ISRO) महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-2 (Chandrayaan 2)अवकाशात झेपावले. इस्रोच्या या कामगिरीबद्दल अवघ्या जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता इस्रोने त्यांच्या पुढील प्रकल्पाची तयारी सुरु केली आहे. इस्रोचे पुढील मिशन हे सूर्यावरील असेल. या मिशनचे नाव आदित्य –एल1 (Aditya-L1)असून, 2020 मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 केल्व्हिनपेक्षा कोरोनाचे तापमान 300 पट अधिक आहे, असे का? याच प्रश्नांचे उत्तर इस्रो या मिशनद्वारे शोधणार आहे.

या मोहिमेत इस्रो सुर्याच्या प्रभामंडळाची (कोरोना) रचना समजून घेणार आहे. आदित्य-एल 1 पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असेल. तिथून तो सूर्यावर लक्ष ठेऊन, सूर्याचा बाहेरील स्टार 'तेजोमंडळ' चे विश्लेषण करेल. हवामान बदलावर याचा मोठा प्रभाव पडतो. आदित्य-एल 1 सूर्याचा फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयर यांचाही अभ्यास करू शकतो. सूर्यामधून बाहेर येणारे विस्फोटक कण देखील या मोहिमेत अभ्यासाचा विषय ठरणार आहेत. इस्रोच्या मते, हे कण पृथ्वीच्या खालच्या कक्षेत निरुपयोगी ठरतात. त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापासून बाहेर ठेवण्याची गरज आहे.

(हेही वाचा: Chandrayaan 2 Launch: 'इस्त्रो' च्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान 2' चं यशस्वी प्रक्षेपण)

या मोहिमेनंतर इस्रो शुक्र ग्रहावरील मोहिमेची तयारी सुरु करण्याची शक्यता आहे. दरम्यान, चांद्रयान-2 ही इस्रोची फार महत्वाची मोहीम आहे. काल दुपारी या उपग्रहाने चंद्राकडे यशस्वी उड्डाण घेतले. प्रक्षेपणानंतर 16 दिवसांत पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करून, 52 दिवसांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. ही गोष्ट 6 किंवा 7 सप्टेंबरला घडेल अशी अपेक्षा आहे. ‘चांद्रयान- 2 ’मध्ये लँडर, रोवर आणि ऑर्बिटर असे तीन भाग आहेत. चंद्रावरील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात येणार आहे. यासाठी चंद्राच्या अशा जागेची निवड केली आहे ज्याचा यापूर्वी कोणी अभ्यास केला नाही.