विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचे (Team India) संपूर्ण लक्ष सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्यावर आहे. लॉर्ड्सवर खेळण्यात आलेला दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय, टीमची नजर आगामी टी-20 वर्ल्ड कपवरही आहेत, ज्याबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उच्च अधिकारी यांच्यात नुकतीच चर्चा झाली. लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजयाने कोहलीवर दबाव कमी केला आहे, परंतु त्याला माहित आहे की कर्णधार म्हणून त्याचे भविष्य मुख्यत्वे संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात संघाच्या कामगिरीवर अवलंबून असेल. भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धची मोहीम सुरु करणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची लॉर्ड्स येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधारासोबत अनौपचारिक बैठक झाली आणि टी-20 विश्वचषकाशी संबंधित विविध पैलू चर्चेसाठी आल्याचे समजले आहे. "बीसीसीआय उच्च अधिकारी कोहलीला भेटले पण आपण असे म्हणूया की चर्चेचे बारीकसारीक तपशील सांगणे योग्य ठरणार नाही. पण टी-20 विश्वचषकासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे आणि (IPL) आधी भारताचे कोणतेही सामने नाहीत, स्पर्धेतमध्ये जाणाऱ्या रोडमॅपबद्दल अधिक चर्चा झाली,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. टीम इंडिया 14 सप्टेंबरपर्यंत कसोटी मालिका खेळणार आहे आणि नंतर खेळाडू आपापल्या आयपीएल फ्रँचायझींमध्ये व्यस्त असल्याने खेळाडूंसाठी तो वेळ महत्त्वाचा आहे आणि कोहलीसोबत मोठ्या कार्यक्रमाबद्दल अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यास यात आश्चर्य नाही.

कोहलीच्या नेतृत्वात भारताला 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल आणि यंदा जून महिन्यात झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तसेच आयसीसी उपांत्य फेरी किंवा अंतिम अडथळा पार करू न शकल्याचे भारतीय संघाचे अपयश चिंतेचे कारण बनले आहे. पुढच्या महिन्यात संघ निवडीसाठी काही कालावधी शिल्लक असल्याने, गोलंदाजीचे कामकाज, अष्टपैलूची स्थिती, मनगट फिरकीपटू आणि सारख्या बदल्यांसह अनेक मुद्दे सोडवणे आवश्यक आहे.