विम्बल्डन (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि आता याच्यात विम्बलडन ग्रँडस्लॅम स्पर्धेचाही समावेश झाला आहे. एक वर्षासाठी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर विम्बल्डनची आयकॉनिक ग्रँड स्लॅम रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. विम्बल्डनला दुसर्‍या महायुद्धानंतर पहिल्यांदा रद्द करावे लागले आहे. बुधवारी, ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोकेट क्लबने कोरोनो व्हायरसमुळे विम्बल्डन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 134 वी चॅम्पियनशिप आता 28 जून ते 11 जुलै 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल. यंदा विम्बल्डनची सुरुवात 29 जूनपासून होणार होती. विम्बल्डन रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यास आयोजकांनी यापूर्वी नकार दिला होता. तीन विम्बल्डन चॅम्पिअनशिपजेता बोरिस बेकर यांनी स्पर्धेच्या आयोजकांना निर्णय घेण्यापूर्वी काही काळ थांबण्याचे आवाहन केले होते. त्यांनी आयोजकांना एप्रिलच्या अखेरपर्यंत स्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करण्यास सांगितले होते.

1877 मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यानंतर दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जात होती. मात्र, 1915 ते 18 दरम्यान पहिल्या विश्व युद्ध आणि 1940-45 मध्ये दुसऱ्या विश्व युद्धामुळे स्पर्धा यापूर्वी रद्द करण्यात आली होती. आणि आता तिसऱ्यांदा ही चॅम्पियनशिप रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, कोविड-19 चा परिणाम जगभरातील क्रीडा स्पर्धांवर झाला आहे. फ्रेंच ओपन स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा मे ऐवजी सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाईल. या व्हायरसमुळे जगभरात 840,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे आणि 40,000 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, यंदा विम्बल्डन रद्द होण्याचा सर्वाधिक नुकसान रोजर फेडरर, व्हिनस आणि सेरेना विल्यम्स यांना झाला आहे. पुढील वर्षी दोघे ही स्पर्धा खेळू शकतील की नाही यावर शंका आहे कारण पुढील वर्षी पर्यंत दोघे 40 वर्ष, तर व्हिनस 41 वर्षाची होईल.