Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये परदेशी प्रेक्षकांवर बंदी; जपान सरकारचा मोठा निर्णय- Report
टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता 23 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरवात होणार आहे. अजूनही कोरोनाचा धोका असल्याने या स्पर्धेसाठी अनेक नवे नियम बनवण्यात आले आहेत. आता टोकियो ऑलिम्पिकसाठी जपान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही परदेशी प्रेक्षकाला प्रवेश मिळणार नाही. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे जपानी सरकारने गेम्समध्ये परदेशी नागरिकांना समाविष्ट न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी ऑलिम्पिक खेळ कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आले होते. आता 23 जुलैपासून टोकियो येथे ऑलिम्पिक खेळ सुरू होणार आहेत जे 8 ऑगस्टपर्यंत चालतील. क्योडो न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार जपान सरकारने स्पर्धेसाठी परदेशी नागरिकांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाची माहिती आयोजन समितीला दिली आहे. वृत्तानुसार जपानमधील नागरिकांच्या आरोग्याच्या चिंता लक्षात घेता जपान सरकारने परदेशी प्रेक्षकांना देशात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. एजन्सीने एका सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, जगभरात वाढत असलेल्या नवीन स्ट्रेन आणि संक्रमणांमुळे देशवासीय चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत सरकारला परदेशी प्रेक्षकांचे स्वागत करणे कठीण होईल. (हेही वाचा: Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये हात मिळवणी करण्यास बंदी, मात्र खेळाडूंना वाटले जाणार 150,000 कंडोम)

जपानमधील लोक ऑलिम्पिक स्पर्धेचा सतत विरोध करीत आहेत. या स्पर्धेमुळे परदेशी लोकांद्वारे कोरोना विषाणूची लागण आपल्या देशातील लोकांना होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय खेळासाठी होणाऱ्या खर्चालाही विरोध आहे. या खेळांमध्ये 11000 ऑलिम्पिक खेळाडू, 4000 पॅराऑलिम्पिक खेळाडू, हजारो प्रशिक्षक, न्यायाधीश, प्रायोजक, मीडिया आणि व्हीआयपी सहभागी होणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार, 75 टक्के जपानी लोकांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये परदेशी चाहत्यांच्या सहभागाला विरोध दर्शविला आहे. त्यानंतर आता सरकारने परदेशी प्रेक्षकांना या खेळांमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली.