Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये हात मिळवणी करण्यास बंदी, मात्र खेळाडूंना वाटले जाणार 150,000 कंडोम
टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty)

कोरोना विषाणूनंतर आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळेच जुलैमध्ये टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) सुरू होईल तेव्हा तेथे सामाजिक अंतराचे पालन केले जाईल, लोक हातमिळवणी करणार नाहीत, एकमेकांना मिठी मारली जाणार नाही. कोरोना व्हायरसनंतर आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमध्ये खेळांमधील क्रीडापटूंवर संघटनांनी कठोर नियम लागू केले आहेत. मात्र दुसरीकडे क्रीडापटूंना तब्बल 150,000 कंडोम (Condoms) वाटण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. japantoday.com अहवालानुसार, व्हायरस नियम पुस्तक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले होते, ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 23 जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिक सुरू होणार आहे.

ऑलिम्पिक खेड्यात राहणाऱ्या खेळाडूंकडून ‘अनावश्यक स्वरूपाचे शारीरिक संपर्क टाळणे’ आणि ‘शक्य तितके इतर लोकांशी संपर्क मर्यादित’ ठेवण्याची अपेक्षा केली जाईल. मात्र दुसरीकडे त्यांना 150,000 कंडोमही वाटण्यात येणार आहेत. संयोजकांचा हा निर्णय सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

टोकियो ऑलिम्पिकसाठी जाहीर करण्यात आलेल्या-33 पृष्ठांच्या व्हायरस नियम पुस्तकात म्हटले आहे की, नियम मोडणाऱ्या एथलीट्सवर कारवाई केली जाईल व त्यांना खेळातून बाहेर करण्यात येईल. दर चार दिवसांनी, एथलीट्सची कोरोनाची चाचणी केली जाईल आणि खेळाडू पॉझिटिव्ह आला तर त्याला खेळण्यास बंदी घातली जाईल. या नियम पुस्तकाचा आढावा पुन्हा एप्रिल आणि जूनमध्ये घेण्यात येईल आणि आवश्यकता वाटल्यास नियमातही बदल करण्यात येतील. जपानमध्ये येणाऱ्या खेळाडूंना 72 तासात कोरोना चाचणी अहवाल सादर करावा लागेल. जपानमध्ये आल्यानंतरही खेळाडूंची कोरोनाची पुन्हा चाचणी केली जाईल. (हेही वाचा: Tata Mumbai Marathon यंदा 30 मे 2021 दिवशी; कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर स्पर्धा लांबणीवर)

यासह एथलीट्सना जिम, पर्यटन स्थळे, दुकाने, रेस्टॉरंट्स किंवा बारमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. एथलीट केवळ अधिकृत गेम स्थान आणि साइट तसेच निवडक ठिकाणीच जाऊ शकतात. खेळाडूंनी प्रत्येकवेळी मास्क घालणे गरजेचे आहे. संयोजकांनी खेळाडूंसाठी कोरोना लसीकरण सक्तीचे केलेले नाही.