IPL 2022: युवा जोशने भरलेला ‘हा’ बनू शकतो CSK चा कर्णधार MS Dhoni चा उत्तराधिकारी; सेहवाग म्हणतो - ‘एक वगळता धोनीचे सर्व गुण आहेत’
एमएस धोनी (Photo Credit: PTI0

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात (Chennai Super Kings) एमएस धोनीच्या (MS Dhoni) जागी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कर्णधार बनवण्याची योजना फ्लॉप ठरली आणि अष्टपैलू खेळाडूने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या हंगामात फक्त 8 सामन्यानंतर कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजा पुन्हा जबाबदारी स्वीकारेल असे वाटत नसताना धोनीचा दीर्घकालीन उत्तराधिकारी शोधण्यासाठी फ्रँचायझीला सुरुवातीपासूनच सुरुवात करावी लागेल. सध्या सीएसके (CSK) संघात जे खेळाडू आहेत, त्यापैकी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा काही प्रमाणात योग्य ठरणारा खेळाडू आहे. सलामी फलंदाजाला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) पाठींबा मिळाला आहे ज्याला त्याच्यात आणि एमएस धोनीमध्ये बरेच साम्य दिसते. (IPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारे केवळ दोनच खेळाडू आपल्या टिमला ठरवू शकले 'नायक', सध्या दोघेही CSK च्या ताफ्यात)

धोनी 40 वर्षांचा आहे, आणि CSK आयपीएल 2022 मधून बाहेर पडल्यामुळे, तो पुढील वर्षी दुसर्‍या हंगामात परततो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. धोनीने यापूर्वी सांगितले आहे की त्याचा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईच्या प्रेक्षकांसमोर असेल. सीएसकेने त्यांच्या पुढील कर्णधाराचा शोध सुरू ठेवला असताना, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला वाटते की सीएसके गायकवाडकडे कर्णधारपद सोपवू शकते. गायकवाड यांच्यात एक चांगला कर्णधार होण्याचे सर्व गुण आहे आणि तो महाराष्ट्र संघाचा कर्णधार असल्यामुळे त्याला या भूमिकेसाठी चांगले स्थान मिळायला हवे असे त्यांचे मत आहे. “तो महाराष्ट्राचा कर्णधार आहे. तो अतिशय शांतपणे खेळतो. त्याने शतक केले तरी ते त्याच्या वागण्यातून दिसत नाही. त्याने शून्य धावा केल्या तरी तुम्हाला तीच वागणूक दिसेल. हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत नाही. जर तो शतक केल्याबद्दल आनंदी असेल किंवा शून्यावर बाद झाल्याबद्दल दुःखी असेल. त्याच्याकडे नियंत्रण आहे, तो शांत आहे. त्याच्याकडे एक चांगला कर्णधार होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्णधार आहे म्हणून त्याला कल्पना आहे सामना कसा ठरवायचा. चेंडू कोणाला द्यायचा, फलंदाजीच्या क्रमात काय बदल करण्याची गरज आहे... त्याला कल्पना आहे,” सेहवाग क्रिकबझवर म्हणाला.

पण ऋतुराजच्या हातात नसलेली एकमेव गोष्ट म्हणजे अनुभव. काही हंगामांपूर्वीच त्याने सीएसकेसाठी पदार्पण केले. रुतुराज अजूनही भारतीय संघात नियमित नाही, पण यलो आर्मीमध्ये धोनीचा दीर्घकालीन उत्तराधिकारी होण्यासाठी सेहवागला त्याच्यामध्ये मोठी क्षमता दिसते. IPL 2022 हा गायकवाडचा CSK सह तिसरा हंगाम आहे, जिथे त्याने आतापर्यंत 12 सामन्यांतून 26.08 च्या सरासरीने 313 धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 2020 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर गायकवाडला कमी संधी मिळाल्या, परंतु त्याने खेळलेल्या सहा सामन्यांत तीन अर्धशतके ठोकत 204 धावा केल्या. तसेच आयपीएल 2021 मध्ये आपला खेळ पुढील स्तरावर नेला आणि ऑरेंज कॅपसह 635 धावा करत हंगाम गाजवला.