आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक 2026 चा अंतिम सामना आज झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात गतविजेता भारत आणि इंग्लंडचा संघ एकमेकांशी भिडणार आहेत. भारतीय संघाने अफगाणिस्तानला पराभूत करत सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज दुपारी 1:00 वाजता (भारतीय वेळेनुसार) या सामन्याला सुरुवात होईल, तर 12:30 वाजता नाणेफेक होणार आहे.

भारताची विजयी घोडदौड भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानने दिलेले 311 धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले. सलामीवीर ॲरॉन जॉर्जचे शानदार शतक आणि वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक अर्धशतकामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली संघ आज सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी मैदानात उतरेल.

India U19 Cricket Team vs England U19 Cricket Team Scorecard

येथे थेट स्कोअर पहा

इंग्लंडचे आव्हान आणि इतिहास दुसरीकडे, थॉमस र्यूच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघही या स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. त्यांनी पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. इंग्लंडने यापूर्वी १९९८ मध्ये एकदाच हे जेतेपद पटकावले आहे. तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याची संधी इंग्लंडकडे आहे. २०२२ च्या विश्वचषक फायनलमध्येही भारत आणि इंग्लंड समोरासमोर होते, ज्यात भारताने बाजी मारली होती.

हरारे येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असली तरी, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.

थेट प्रक्षेपण कोठे पाहाल? क्रिकेट चाहत्यांना या महामुकाबल्याचा आनंद स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network) घेता येईल. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'जिओ हॉटस्टार' (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.

भारतीय संभाव्य संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), ॲरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन. (Ayush Mhatre (captain), Aaron George, Vaibhav Suryavanshi, Vedant Trivedi, Vihaan Malhotra, Abhigyan Kundu (wicketkeeper), R.S. Ambareesh, Kanishk Chauhan, Khilan Patel, Henil Patel, Deepesh Devendran)