Goregaon-CSMT Harbour Line Services: गोरेगाव-सीएसएमटी हार्बर सेवा 3 महिने राहणार बंद; प्रवाशांची मोठी गैरसोय

भविष्यात होणारे फायदे सध्या तीन महिने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असला तरी, या प्रकल्पाचे भविष्यातील फायदे मोठे आहेत. नवीन मार्गिका तयार झाल्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करता येईल.

Goregaon-CSMT Harbour Line Services: गोरेगाव-सीएसएमटी हार्बर सेवा 3 महिने राहणार बंद; प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानची हार्बर सेवा आगामी काळात सलग तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. वांद्रे आणि खार दरम्यानचा जुना रेल्वे पूल पाडून त्या ठिकाणी नवीन मार्गिका तयार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सुमारे 3.62 लाख प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Mumbai Local Train Update: प्रकल्पाचे स्वरूप आणि गरज मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान असलेला जुना रेल्वे पूल या कामात मोठा अडथळा ठरत होता. हा पूल पाडून त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. सुरुवातीला या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित होता. मात्र, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेने तांत्रिक नियोजन करून हा कालावधी तीन महिन्यांवर आणला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 964.84 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रवाशांवर होणारा परिणाम गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान सध्या दररोज 88 फेऱ्या धावतात, तर वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान १०६ फेऱ्या चालवल्या जातात. हार्बर सेवा बंद राहण्याच्या काळात गोरेगाव ते वांद्रे दरम्यानची सेवा पूर्णपणे खंडित असेल. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा विचार आहे. परंतु, गोरेगाव आणि अंधेरी परिसरातील प्रवाशांना पर्यायी म्हणून पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (चर्चगेट मार्ग) लोकल गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

कामात येणारे अडथळे हा प्रकल्प मार्गी लावताना रेल्वे प्रशासनासमोर अनेक आव्हाने आहेत. माहीम आणि सांताक्रूझ दरम्यान पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने कामाची गती मंदावली होती. तसेच, वांद्रे पूर्वेकडील गरीब नगरमधील 155 कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. या व्यतिरिक्त, काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपामुळेही जमीन अधिग्रहणाच्या कामात अडचणी येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व अडचणी दूर करून डिसेंबर 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भविष्यात होणारे फायदे सध्या तीन महिने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असला तरी, या प्रकल्पाचे भविष्यातील फायदे मोठे आहेत. नवीन मार्गिका तयार झाल्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करता येईल. तसेच लांब पल्ल्याच्या (एक्स्प्रेस) गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध झाल्याने लोकल गाड्यांना आता एक्स्प्रेससाठी थांबावे लागणार नाही. यामुळे लोकलचा वेग वाढेल आणि वेळापत्रक अधिक अचूक होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2026 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).