प्रातिनिधिक प्रतिमा Photo Credit: File Photo)

संपूर्ण जगात, भारत आपली संस्कृती, परंपरा, निसर्गाच्या आश्चर्यकारक छटा यांसाठी प्रसिध्द आहे. श्रावणातील धार्मिक कृत्ये आवरल्यानंतर, पावसाळ्यात अनेक सण साजरे होतात. मान्सूनमध्ये पाण्याशी संबंधित अनेक सणांचे, उत्सवांचे आयोजन केले जाते. त्यापैकीच एक म्हणजे केरळची प्रसिद्ध बोट रेस. या शर्यतीला 'वल्लमकाली' म्हटले जाते. ही बोटींची शर्यत पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आवर्जून केरळला भेट देतात.

यावर्षीची 2018 केरळ नेहरू ट्रॉफी बोट रेस अलप्पुझाच्या सुंदर बॅकवॉटरमध्ये सुरू झाली आहे. केरळमधील अलप्पुझाच्या बॅकवाटर्समध्ये असणाऱ्या पुन्नमड तलावामध्ये होणारी ही बोट रेस फार प्रसिद्ध आहे. आज  सकाळी 11.30 वाजता या शर्यतीला सुरुवात झाली. 81 बोटींनी यात सहभाग घेतला होता. यावर्षी दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि त्यांची पत्नी स्नेहा रेड्डी यांना मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. केरळचे राज्यपाल पी. सथशिवम यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.

पय्यपड़ बोट रेस:

अलप्पुझाच्याच  पय्यपड नदीत आणखी एक बोट रेस होते. केरळमधील नेहरू ट्रॉफी बोट रेसनंतरची ही सर्वात मोठी शर्यत आहे. या शर्यतीची सुरुवात हरिपद मंदिर आणि सुब्रह्मण्यम स्वामी मंदिरातील मूर्ती स्थापनेनंतर झाली. या मूर्तीच्या स्थापनेदरम्यान येथील गावक-यांना स्वप्न पडले, त्यानंतर कायमकुलम तलावात त्यांना ही मूर्ती सापडली. त्या काळापासून सुरु झालेल्या बोटीच्या शर्यतीची परंपरा अजूनही आहे.

नेहरू ट्रॉफी बोट रेस दरम्यान, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, जात, धर्म आणि पंथ या सर्वांमधील अंतर नाहीसे होते. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेला जातीभेद या बोट रेसमुळे मिटला.  बोट रेसच्या प्रशिक्षणादरम्यान तलावाजवळ जी मेजवानी झडते त्यावेळी हिंदू, अनुसूचित जाति, ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक एकत्र बसून जेवण करताना दिसतात. एका हिंदूंशी जोडल्या गेलेल्या या परंपरेत चर्चदेखील तितक्याच उत्साहाने सामील होते.  या शर्यतीमुळे  एकता आणि बंधुतेचे एक अनोखे उदाहरण पाहायला मिळते.