ICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्ड कप'मधील सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडतील हे '3' फलंदाज!
Sachin Tendulkar (Photo Credits: File Photo)

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC Cricket World Cup) सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावे आहे. त्याचबरोर एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या. सचिनचा हा विक्रम आतापर्यंत कोणताच खेळाडू मोडू शकलेला नाही. मात्र असे काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे सचिनचा हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे 3 खेळाडू...

शिखर धवन (भारत)

भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) या यादीत नंबर एकवर आहे. आयसीसी टुर्नामेंटमध्ये शिखर उत्तम फलंदाजी करताना दिसला. तर इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 आणि 2017 मध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर गेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. यामुळे सचिनचा रेकॉर्ड मोडण्याची शिखरची क्षमता असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर शिखर धवन सलामी फलंदाज असल्याने त्याला अधिक तगडी फलंदाजी करण्याची संधी ही आहे.

जॉनी बेयरेस्टो (इंग्लंड)

या यादीतील दुसरे नाव आहे इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरेस्टो (Jonny Bairstow) याचे. गेल्या काही काळापासून जॉनी इंग्लंडसाठी चांगली सुरुवात करत आहे. त्याचबरोबर इतर देशातील खेळाडूंच्या तुलनेत त्याला देशातील मैदाने, पीच याबद्दल अधिक चांगली माहिती आहे.

आतापर्यंत जॉनी बेयरेस्टो ने आपल्या करिअरमध्ये 60 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण 2169 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 105 धावांचा आहे. त्यामुळे सचिनचा विक्रम मोडण्यासाठी हा सक्षम खेळाडू असल्याचे मानले जात आहे.

डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. वर्षभराच्या बंदीनंतर त्याने दमदार पुर्नरागमन केले आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर न्युझीलंडसोबतच्या सामन्यातही त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती.

वॉर्नरच्या या दमदार फॉर्ममुळेच तो सचिनचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रभावी दावेदार असल्याचे बोलले जात आहे. वॉर्नरने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 106 सामन्यात 4323 धावा केल्या असून त्यात 14 शतकांचाही समावेश आहे.