Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

IND vs ZIM: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघ यांच्यात शनिवारी पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाला. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. स्फोटक फलंदाज यशस्वी जैस्वालने तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये प्रवेश केला. यशस्वी जैस्वाल तिसऱ्या टी-20मध्ये फुल फॉर्ममध्ये दिसत होता. शुभमन गिलसह डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने 27 चेंडूत 36 धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर यशस्वी जैस्वालने यावर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे.

यशस्वी जैस्वालने केला अनोखा पराक्रम

झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वालने कर्णधार शुभमन गिलसह पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. यादरम्यान यशस्वी जैस्वालने 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल खराब शॉट खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. या 36 धावांसह यशस्वी जैस्वालने यावर्षी 9 सामन्यात 848 धावा पूर्ण केल्या आणि रोहित शर्माला मागे सोडले. रोहित शर्माने 833 धावा केल्या होत्या.

बाबर आझमलाही मागे टाकले

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत यशस्वी जैस्वालने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही मागे टाकले आहे. बाबर आझमने यावर्षी 25 डावात 709 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: IND vs ZIM 4th T20I: चौथ्या टी-20 मध्ये टीम इंडियात होऊ शकतात 'हे' तीन बदल, धोनीच्या 'या' हुकमी एक्काला मिळू शकते पदार्पणाची संधी)

या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे 

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना गमावला होता, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत मालिकेत आघाडी घेतली. या मालिकेतील चौथा सामना उद्या हरारे येथे सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे.